शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करत शिवसेनेचं शिवबंधन सोडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर महाविकासआघाडीत सगळं आलबेल नसल्याचं पुन्हा स्पष्ट झालं. त्यानंतर आता अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत साबणे यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. निष्ठावतं म्हणवणाऱ्यांनी पक्ष सोडत असताना दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वतःची भूमिका स्पष्ट करावी असं मत व्यक्त केलं. तसेच सुभाष साबणे मुळात शिवसेनेचे आहेत. मी काँग्रेसचा आहे. त्यामुळे माझ्या संबंध काय? या प्रकरणात माझा प्रश्नच येत नाही, असंही त्यांनी नमूद केलं. ते नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
” निष्ठावंत म्हणवणाऱ्यांनी पक्ष सोडत असताना दुसऱ्यावर बोट दाखवण्यापेक्षा …”
अशोक चव्हाण म्हणाले, “सुभाष साबणे हे मुळात शिवसेनेचे आहेत. हे महाविकासआघाडी सरकार आहे. या सरकारमध्ये तिन्ही पक्षांचे मंत्री आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. त्यामुळे सुभाष साबणे यांना कुठं जायचं हा त्यांचा प्रश्न आहे. मला त्यात काही बोलायचं नाही. मुळात ते शिवसेनेचेच आहेत. त्यामुळे मला काही विचारण्याऐवजी त्यांनी शिवसेनेबाबत काही भूमिका स्पष्ट करावी. निष्ठावंत म्हणवणाऱ्यांनी पक्ष सोडत असताना दुसऱ्यावर बोट दाखवण्यापेक्षा त्यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट करावी. ते चांगलं होईल.”
” ते शिवसेनेत आहेत, माझा संबंधच काय?”
“मी काँग्रेसमध्ये आहेत आणि ते शिवसेनेत आहेत. माझा संबंधच काय आहे. त्यामुळे माझ्या संबंधातील प्रश्नच येत नाही. निवडणुकीत वैचारिक लढाई असते. त्यामुळे आम्ही निश्चितपणे ही लढाई जिंकू,” असंही त्यांनी नमूद केलं. भाजप पंढरपूरची पुनरावृत्ती करेल अशी चर्चा असताना अशोक चव्हाण यांनी हे मुंगेरीलालचे स्वप्न आहे. त्यांना हे स्वप्न पाहू द्या, असं मत व्यक्त केलं.
सुभाष साबणे नेमकं काय म्हणाले होते?
सुभाष साबणे म्हणाले, “मी आजही शिवसैनिक आहे. 4 ऑक्टोबरनंतर जो काही निर्णय आहे तो होईल. माझ्या शिवसैनिकाचा अपमान झाला. पोलिसांनी बुटासह तुडवलं. अशोक चव्हाण यांनी बॅनरवर माझ्या नेत्याचा कधीच फोटो छापला नव्हता. बॅनरवर महाविकासआघाडीच्या नेत्याचे फोटो राहावेत. माझ्या मतदारसंघात येताना महाविकासआघाडीचे नेते म्हणून आघाडीतील घटक पक्षाला सोबत घेऊन आलं पाहिजे. तुम्ही पक्षाचा कार्यक्रम राबवायला नको हीच आमची भूमिका होती. त्यामुळेच आम्ही काळे झेंडे दाखवत होतो. तर पोलिसांनी पकडून बुटासह कार्यकर्त्यांना मारलं.”
“… म्हणून मी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला”
“देशाच्या पंतप्रधानाला देखील काळे झेंडे दाखवले जातात. बिलोली तालुक्यातील हा प्रकार घडला. मला वाईट वाटलं. म्हणून मी हा निर्णय घेतला. 1984 पासून मी शिवसैनिक आहे. ज्या दिवशी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अटक होणार होती त्या दिवशी आम्ही विधानसभेत मोडतोड केली होती. त्यामुळे १ वर्षासाठी आम्ही निलंबित झालो. ते दिवसही आम्ही पाहिले,” असं मत सुभाष साबणे यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केलं.
“आमचे मुख्यमंत्री असतानाही शिवसैनिकांना पोलिसांकडून बुटांसह मारहाण”
शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही शिवसैनिकांवर झालेल्या कारवाईवर सुभाष साबणे यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “शिवसेनेच्या चांगल्या वाईट दिवसांमध्ये आम्ही शिवसेनेसोबत होतो. पण आज मुख्यमंत्री आमचे आहेत, तरी आमच्या कार्यकर्त्यांना बुटासह मारलं जातं. याचं वाईट वाटलं, खंत वाटली. माझ्या पक्षाच्या कोणत्याही नेत्यावर माझी नाराजी नाही. फक्त नांदेड जिल्ह्याचं जे नेतृत्व आहे त्या अशोक चव्हाण यांना आमचा विरोध आहे.”
भाजपाचा शिवसेनाला झटका, पक्षप्रवेशाआधीच ‘या’ माजी आमदाराला उमेदवारी जाहीर