उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पहाटेच्या शपथविधी’वर केलेल्या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच आम्ही विद्यमान विरोधी पक्षनेता अजित पवार यांना सोबत घेऊन सरकारची स्थापना केली होती, असे फडणवीस म्हणाले आहेत. फडणवीसांच्या याच विधानावर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज (१३ फेब्रुवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
हेही वाचा >>>> नाना पटोलेंचा भाजपावर गंभीर आरोप, अनिल देशमुखांवर बोलताना म्हणाले, “परमबीर सिंह यांचे १०० कोटी….”
निवडणुकीच्या तोंडावर संभ्रम निर्माण करणे हाच उद्देश
“देवेंद्र फडणवीस यांना हा साक्षात्कार निवडणुकीच्याच तोंडावर कसा होता, हा प्रश्न आमच्यासमोर आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. ते मुरब्बी राजकारणी आहेत. शरद पवार असे कधीही करणार नाहीत. ते जी भूमिका घेतात ती खुलेआम घेतात. लपून छपून राजकारण करण्याचा त्यांचा स्वभाव नाही. निवडणुकीच्या तोंडावर संभ्रम निर्माण करणे हाच फडणवीसांच्या विधानाचा हेतू आहे,” असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत.
हेही वाचा >>>> काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण? नाना पटोलेंनी दिले थेट उत्तर; म्हणाले, “मला…”
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर चर्चा करत होते. तेव्हा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली होती की, आम्हाला स्थिर सरकार हवं आहे. त्यानंतर शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती. त्यानंतर गोष्टी ठरल्या होत्या. मात्र, ठरल्यानंतर त्या कशा बदलल्या, हे सर्वांनी पाहिलं आहे,” असे वक्तव्य ‘टीव्ही ९ मराठी’च्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी केले.
हेही वाचा >>>> जयंत पाटलांकडून एकनाथ शिंदेंचे तोंडभरून कौतूक, जाहीर मुलाखतीत म्हणाले; “ते…”
शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
फडणवीसांच्या या विधानानंतर खुद्द शरद पवार यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. “देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत आणि सभ्य व्यक्ती आहेत. असत्याचा आधार घेऊन अशा प्रकारची विधानं ते करतील, वाटलं नव्हतं,” अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे.
हेही वाचा >>>>शिंदे गटाविरोधात आदित्य ठाकरेंनी थोपटले दंड, निवडणुकीचा उल्लेख करत म्हणाले, “शून्यावर आलो तरी…”
दरम्यान देवेंद्र फडणीसांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. फडणवीसांच्या या विधानावर आता अजित पवार काय प्रतिक्रिया देणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.