नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. सत्यजीत तांबे यांना डावलल्यामुळे तांबे कुटुंबाने प्रदेश काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांचे मामा तथा काँग्रेसमधील वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. थोरात यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेसधील याच अंतर्गत राजकारणावर आता काँग्रेसचे नेते अशोच चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा >>>ज्यांच्या राजीनाम्याची चर्चा रंगली आहे ते बाळासाहेब थोरात कोण आहेत? कशी आहे राजकीय कारकीर्द?
“बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याबद्दल आत्ताच कळालं असून त्यांचा राजीनामा ही दुर्दैवी बाब आहे. आज थोरात यांचा वाढदिवस असून सकाळीच मी त्यांना शुभेच्छा दिल्या. थोरात यांची मनधरणी करण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे. काँग्रेस पक्ष वाढीसाठी सर्व काही करणार आहे,” असे अशोक चव्हाण म्हणाले. तसेच थोरात पक्ष सोडून जाणार नाहीत, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.
हेही वाचा >>> बाळासाहेब थोरात यांना भाजपामध्ये प्रवेश देणार का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “आम्ही पक्ष वाढविण्यासाठी…”
दरम्यान बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांनी हे मोठे पाऊल उचलल्यामुळे सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या राजीनाम्यानंतर बाळासाहेब थोरात आगामी काळात कोणता निर्णय घेणार? याकडेही सर्वांचेच लक्ष लागले आहे. यावरच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. कुणालाही भाजपात यायचे असेल तर ते येऊ शकतात. आम्ही सर्वांचे स्वागतच करत आहोत, असे बावनकुळे म्हणाले आहेत.