गेल्या काही दिवसांमध्ये निवडणुकीच्या मैदानात सपाटून मार खाल्ल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस संघटनेत सोमवारी पहिल्यांदाच मोठे फेरबदल करण्यात आले. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या जागी अशोक चव्हाण यांची निवड करण्यात आली. चव्हाण यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील भक्कम स्थान पाहता पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी पक्षाने त्यांना संघटनेत परत आणण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांत त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, पेड न्यूड प्रकरणाची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर असल्याने यामध्ये अडथळे येत होते. परंतु, गेल्या काही दिवसांत न्यायालयाकडून चव्हाण यांना मिळालेला दिलासा आणि त्यांचे उत्तम संघटनकौशल्य ध्यानात घेता काँग्रेसने त्यांच्या गळ्यात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची माळ टाकली.
तर दुसरीकडे मुंबई काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी उत्तर भारतीय समाजाचा चेहरा असणारे संजय निरूपम यांची वर्णी लागली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांचा विचार करता उत्तर भारतीय समाजाचा चेहरा असलेल्या संजय निरूपम यांच्याकडे पक्षाने मुंबई अध्यक्षपदाचा पदभार सोपवला आहे. महानगरपालिका निवडणुकीत पक्षाला यश मिळवायचे असल्यास उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतांची निर्णायक भूमिका लक्षात घेता, काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे मुंबईतील उत्तर भारतीय समाजात लोकप्रिय असणाऱ्या आणि आक्रमक नेते म्हणून प्रसिद्ध असणारे संजय निरूपम पक्षाला कितपत यश मिळवून देणार हे पाहणे, आता औत्स्युकाचे ठरेल. मुंबई प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर निरूपम यांनी आपण येणाऱ्या काळात सर्वांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे सांगितले. काँग्रेस पक्ष मुंबईत पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारेल, अशा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
गेल्या काही दिवसांमध्ये निवडणुकीच्या मैदानात काँग्रेसने सपाटून मार खाल्ल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षात संघटनात्मक फेरबदल करण्याची मागणी करण्यात येत होती. त्याच पार्श्वभूमीवर हे बदल करण्यात आल्याचे समजते. यापूर्वी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी जनार्दन चांदूरकर तर माणिकराव ठाकरे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत होते.
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाण यांची वर्णी
गेल्या काही दिवसांमध्ये निवडणुकीच्या मैदानात सपाटून मार खाल्ल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस संघटनेत सोमवारी पहिल्यांदाच मोठे फेरबदल करण्यात आले.
First published on: 02-03-2015 at 12:46 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok chavan elected as maharashtra congress chief and sanjay nirupam will be president of mumbai congress