Maharashtra Former CM Ashok Chavan Resigned from Congress लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांना भाजपा राज्यसभेवर पाठवणार असल्याची चर्चा आहे. मी राजीनामा दिला आहे. अनेकदा प्रत्येक गोष्टीचं कारण सांगितलंच पाहिजे असं नाही. मी माझा योग्य वेळ घेऊन पुढच्या वाटचालीचा निर्णय जाहीर करेन असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हटलं आहे अशोक चव्हाण यांनी?
“मी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस वर्किंग कमिटी, प्राथमिक सदस्यत्त्व विधिमंडळ काँग्रेस पक्ष राजीनामा दिला आहे. मी काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले आहे. माझी कोणाबद्दल वेगळी भावना नाही. जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे काम केलं. आता मी निर्णय घेईन, दिशा ठरवेन. एक दोन दिवसात राजकीय भूमिका ठरवेन. ” ही त्यांची पहिली प्रतिक्रिया आहे. तसंच भाजपात जाणार का विचारल्यावर त्याचंही त्यांनी उत्तर दिलं.
भाजपात जाणार का?
भाजपाची कार्यप्रणाली मला माहिती नाही. मी अद्याप भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. दोन दिवसांमध्ये मी माझी राजकीय भूमिका स्पष्ट करेन. असं थेट उत्तर अशोक चव्हाण यांनी दिलं आहे. आता अशोक चव्हाण यांनी जरी हे उत्तर दिलं असलं तरीही देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेनंतर आगे आगे देखो होता है क्या असं सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवलं जाईल अशी चर्चा आहे.
काँग्रेस पक्ष सोडण्याचं कारण काय?
काँग्रेस पक्ष सोडण्याचं कारण काय असं विचारणा करण्यात आल्यानंतर अशोक चव्हाण म्हणाले की, प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे असे काही नाही. मी जन्मपासून आतापर्यंत काँग्रेसचे काम केले. आता मला वाटतं मला आता अन्य पर्याय पाहिले पाहिजेत. म्हणून मी पक्षाचा राजीनामा दिला.
हे पण वाचा- काँग्रेसची अवस्था शरपंजरी झालेल्या भीष्माचार्यांसारखी का झाली?
राहुल गांधींशी चर्चा केलीत का?
आज जेव्हा अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा राहुल गांधींशी तुम्ही या सगळ्या बाबत चर्चा केलीत का? असा प्रश्न चार ते पाच वेळा विचारण्यात आला. त्यावर त्यांनी एकदाही उत्तर दिलं नाही. शेवटी फक्त नकारार्थी मान डोलवली आणि प्रतिक्रिया दिली. अशोक चव्हाण यांची ही सूचक कृती चर्चेत राहिली. अशोक चव्हाण यांनी आपण राजीनामा दिल्यानंतर कुठल्याही आमदाराशी बोललो नसल्याचंही म्हटलं आहे. आता अशोक चव्हाण यांची पुढची दिशा काय असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.