गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या समीकरणाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत जाहीर सभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यंदा महाराष्ट्रात त्याच भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबर महायुतीत जाणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. यासंदर्भात महायुतीमधील देवेंद्र फडणवीसांपासून अनेक नेतेमंडळींनी सकारात्मक वक्तव्ये केली आहेत. आता खुद्द राज ठाकरे यासंदर्भात काय भूमिका जाहीर करणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आज (९ एप्रिल) मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे त्यांची भूमिका मांडू शकतात.
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याआधी भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी राज ठाकरे यांच्या महायुतीत सहभागी होण्याबाबत वक्तव्य केलं आहे. अशोक चव्हाण म्हणाले, मधल्या काळात राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर असं वाटतंय की राज ठाकरे हे महायुतीला पाठिंबा देतील.
दरम्यान, यावेळी चव्हाण यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाचे केंद्रातले अनेक नेते महाराष्ट्रात लोकसभेचा प्रचार करत आहेत. यावरून अंबादास दानवे म्हणाले होते की भाजपाचे महाराष्ट्रातील नेते कुचकामी आहेत. त्यामुळे त्यांना प्रचारासाठी महाराष्ट्रात आणावं लागत आहे. यावर अशोक चव्हाण म्हणाले, निवडणुकीच्या काळात असे आरोप प्रत्यारोप होत असतात. मी अंबादास दानवेंच्या वक्तव्याला फारसं महत्त्व देत नाही. आगामी काळ हा निवडणुकीचे निकाल सांगणारा आहे. देशात आणि राज्यात इंडिया आघाडीच्या सभादेखील होत असतात. त्यांचेही नेते राज्यभर, देशभर फिरतात. त्याच हेतुने माहायुतीचे नेते महाराष्ट्रात येतात. त्यात गैर काही नाही. केंद्रातल्या नेत्यांना प्रचार करण्यासाठी बोलावणं चुकीचं नाही. निवडणूक काळात एखाद्या मोठ्या नेत्याला पाचारण करण्यात काही गैर नाही.
हे ही वाचा >> “राज्यातलं काँग्रेस नेतृत्व कमकुवत”, सांगली-भिवंडीच्या जागेवरून अशोक चव्हाणांचा खोचक टोला; नेमका रोख कोणाकडे?
मनसेच्या पाडवा मेळाव्याच्या भाषणाकडे लक्ष
आज मनसेच्या पाडवा मेळाव्यामध्ये पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य करण्याची शक्यता आहे. गेल्या दोन महिन्यांत त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाहीर कार्यक्रमांमधून ‘पाडवा मेळाव्यात सविस्तर बोलेन’ असं सांगितलं आहे. त्यात यंदाच्या पाडवा मेळाव्याआधीच मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याचे दावे केले जात असताना त्यासंदर्भात राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.