काँग्रेस आमदार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली होती. आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी केला होता. तसेच, विनायक मेटेंप्रमाणेच आपल्यालाही संपवण्याचा कट चालू असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेत तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असतानाच अशोक चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपल्या आरोपांविषयी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, आपल्याला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा हा डाव असल्याचंही अशोक चव्हाण म्हणाले.
पाळत ठेवल्याचा आरोप
अशोक चव्हाण यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला आहे. “अज्ञात व्यक्तींकडून माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. मी कुठे जातो, गाडीने कधी फिरतो, कुणाला भेटतो यावर पाळत ठेवली जात आहे”, असं अशोक चव्हाण म्हणाले. या पार्श्वभूमीवर आजही त्यांनी याबाबत भूमिका मांडली असून आपल्याला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
“पाळत ठेवून विनायक मेटे करण्याचा डाव”, जीव गेला तरी चालेल म्हणत अशोक चव्हाणांचे गंभीर आरोप
“मूळ सहीचं बनावट लेटरपॅड वापरलं”
“पाळत ठेवण्याच्या काही घटना समोर येत आहेत. मी जिल्हा पोलीस अधीक्षकांना याची कल्पना दिली होती. एक पत्र माझ्या हातात आलं. त्यात मूळ सहीचं बनावट लेटरपॅड वापरलं गेलंय. त्यावर मराठा समाजाच्या विरोधात मी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिल्याचं भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.जणूकाही मराठा समाजाला आरक्षण मिळू नये अशी माझी भावना असल्याचं त्या मजकुरात नमूद करण्यात आलं होतं. माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करून त्या पत्राचा राजकीय फायदा उचलण्यासाठीचा खटाटोप हा त्यातला मुख्य मुद्दा आहे”, असं अशोक चव्हाण म्हणाले.
“भविष्यात इतर समाजांच्या बाबतीतही…”
“ते पत्र मुख्यमंत्र्यांकडे गेलं असेल तर त्यावर त्यावर तशा नोंदी पाहिजेत. पण असं काहीही त्यावर नाहीये. त्यामुळे हे स्पष्टच दिसतंय की ते बनावट पत्र आहे. त्याचा उपयोग राजकीयदृष्ट्या मला पूर्णपणे संपवण्यासाठी केला जात आहे. कुणाला काय वाटतंय हा भाग वेगळा. मराठा मंत्रीमंडळ उपसमितीचा मी अघ्यक्ष होतो. आरक्षण मिळावं हीच माझी भूमिका होती. धार्मिक-सामाजिक भावना भडकवणं हा त्यामागचा उद्देश आहे. आगामी काळात अशाच प्रकारे इतर समाजांच्या बाबतीत अशी पत्र तयार करून लोकांना भडकवण्याचा खटाटोप माझ्या राजकीय विरोधकांचा आहे”, असा आरोपही अशोक चव्हाण यांनी केला.