शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी नुकतंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याबाबत मोठं विधान केलं. आगामी लोकसभा निवडणुकीआधी अशोक चव्हाण भाजपात जातील, असा मोठा दावा शिरसाट यांनी केला. शिरसाट यांच्या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिरसाट यांच्या दाव्यावर स्वत: अशोक चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. संजय शिरसाट यांच्या कोणत्याही वक्तव्याची दखल घ्यायला हवी, असं मला वाटत नाही. येत्या काळात संजय शिरसाट यांनाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेल्याशिवाय पर्याय नाही, असं विधान अशोक चव्हाण यांनी केलं आहे. ते नांदेड येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा- “लोकसभा निवडणुकीआधी अशोक चव्हाण भाजपात जातील, कारण…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

संजय शिरसाट यांनी केलेल्या दाव्याबाबत विचारलं असता अशोक चव्हाण म्हणाले, “संजय शिरसाट हे भविष्यकार आहेत का? शिरसाटांच्या कुठल्याही वक्तव्याची फार दखल घ्यायला हवी, असं मला वाटत नाही. दुसरा मुद्दा असा की, त्यांना मंत्रिमंडळात घेतलं जात नाही, हे निश्चितच झालं आहे. या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होतच नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही, त्यामुळे त्यांच्याकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेल्याशिवाय पर्याय नाही. ते लवकरच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जातील.”

हेही वाचा- “अशोक चव्हाण भाजपात जाणार”, संजय शिरसाटांच्या दाव्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले होते?

“काँग्रेसमध्येच एकवाक्यता नाही. अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांचं जमत नाही. बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांचंही जमत नाही. त्यामुळे मला तरी असं वाटतं की, अनेक दिवसांच्या घडामोडीवरून अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपात जातील. कारण एवढ्या मोठ्या नेत्याला तिथं योग्य वागणूक मिळत नाही, असं एकंदर दिसत आहे,” असा दावा संजय शिरसाट यांनी केला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok chavan on sanjay shirsat about rejoining uddhav thackeray group nanded rmm