Ashok Chavan Latest Updates : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज (१३ फेब्रुवारी) भाजपात जाहीर प्रवेश केला. यावेळी अशोक चव्हाण म्हणाले, “आता मी माझ्या राजकीय कारकिर्दीची नवी सुरुवात करत आहे. मी आजपासूनच सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कामाला सुरुवात केली आहे.” अशोक चव्हाण यांनी सोमवारी (१२ फेब्रुवारी) आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज अधिकृतपणे भाजपात प्रवेश केला आहे.
पक्षप्रवेशानंतर अशोक चव्हाण म्हणाले, मी इतकी वर्षे काँग्रेससाठी काम केलं. मी माझ्या ३८ वर्षांच्या राजकीय प्रवासाची दिशा बदलतोय. मी आज भाजपात प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन या देशात आणि राज्यात चांगलं काम करता आलं पाहिजे, सकारात्मक भूमिका घेऊन पुढील वाटचाल करता आली पाहिजे, राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीत आपलं योगदान असलं पाहिजे, अशी माझी भावना आहे. याच प्रामाणिक भूमिकेतून मी आज भाजपात प्रवेश करतोय.
अशोक चव्हाण म्हणाले, मी आजवर नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन ठेवून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम केलं आहे. मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस विरोधात होते. तेव्हापासून आम्हाला एकमेकांच्या कामांचा अनुभव आहे. त्या काळातही आम्ही एकमेकांना साथ दिली आहे. काही सहकाऱ्यांच्या तक्रारी होत्या, त्या तक्रारी मी मान्य करेन. मी नेहमीच आमच्या जिल्ह्याला, मतदारसंघाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. देवेंद्र फडणवीसही त्यासाठी सकारात्मक होते.
हे ही वाचा >> अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश, देवेंद्र फडणवीस म्हणाले; “आज आमच्यासाठी आनंदाचा दिवस कारण..”
भाजपा प्रवेशावरून टीका करणाऱ्यांनाही अशोक चव्हाण यांनी यावेळी उत्तर दिलं. चव्हाण म्हणाले, राजकारण हे सेवेचं माध्यम आहे. मला कोणावरही व्यक्तीगत टिकाटिप्पणी करायची नाही. पक्ष सोडल्यावर अनेक सहकारी विरोधात बोलतात, टिकाटिप्पणी करतात, तर काहीजण समर्थन करत आहेत. लोकांमध्ये मतभिन्नता असू शकते. परंतु, व्यक्तीगत स्वरुपाचे दोषारोप मी कधी कोणावर केले नाहीत. आताही मी तसं काही करणार नाही. आजपासूनच सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कामाला लागलोय. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला पक्षप्रवेशाची पावती दिली आहे. मी पक्षप्रवेशाचं शुल्कही दिलं आहे.