भाजपाचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी रात्री मनोज जरांगेंची भेट घेतली. तसंच त्यांनी काहीवेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्रातल्या तालुक्या-तालुक्यांमध्ये मराठा आणि ओबीसी वाद निर्माण झाला आहे. ही बाब चांगली नाही. मी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. असंही अशोक चव्हाण यांनी पत्रकारांना सांगितलं.
मनोज जरांगेंना मदतीचं आश्वासन
मनोज जरांगेंची भेट आम्ही घेतली. काही मागण्या प्रलंबित आहे. सरसकट गुन्हे मागे घ्या ही त्यांची मागणी आहे. त्याकडे आपण लक्ष घालतो आहोत. हैदराबाद गॅझेट प्रमाणे कुणबी प्रमाणपत्रं दिली जावीत ही मागणी आहे. काही गोष्टींचा पाठपुरावा सुरु आहे. मी त्यांना सांगितलं आहे की मी तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य करतो आहे हे मी मनोज जरांगेंना सांगितलं आहे असं अशोक चव्हाण म्हणाले.
Manoj Jarange On Ashok Chavan: अशोक चव्हाण यांच्याबरोबर झालेल्या चर्चेवर पहिल्यांदाच बोलले जरांगे
मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही माझी व्यक्तिगत भूमिका
मी मनोज जरांगे यांची भेट घेतली. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही माझीही व्यक्तिगत भूमिका आहे. मी हा प्रश्न सरकारपुढे याआधीही मांडला आहे. त्यानुसार मी मनोज जरांगेंना माझी भूमिका सांगितली आहे. तसंच त्यांनी सरसकट गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. मात्र सरकट गुन्ह्यांमध्ये जे गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत जसं की जाळपोळ करणं, तोडफोड, हल्ला करणं अशा सारख्या गुन्ह्यांची प्रकरणी कोर्टात गेली आहेत. त्याचं काय करता येईल यावर चर्चा करावी लागेल. त्याशिवाय जी किरकोळ प्रकरणं आहेत ती मागे घेता येतील. मात्र गंभीर गुन्ह्यांची प्रकरणं कोर्टात आहेत. असं अशोक चव्हाण म्हणाले. तसंच मी मनोज जरांगेंशी चर्चा केली. त्यांची मागणी हैदराबाद गॅझेटबाबतही आहे. विभागीय आयुक्तांनी त्या गॅझेटचा अभ्यास केला आहे. त्यांच्याकडून मी माहिती मागवली आहे. असंही अशोक चव्हाण म्हणाले.
गावा-गावांमध्ये वाद निर्माण झाला आहे
ओबीसी आणि मराठा तरुणांमध्ये समन्वय निर्माण व्हावा यासाठी मी प्रयत्न करतो आहे. आज घडीला जिल्हा आणि तालुक्यांमध्ये मराठा आणि ओबीसी वाद सुरु झाला आहे. हा वाद महाराष्ट्राच्या हिताचा नाही. समन्वय असला पाहिजे आणि वाद होऊ नयेत असा आमचा प्रयत्न असणार आहे. असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसंच गावागावांमध्ये जे वाद निर्माण होत आहेत त्याबद्दल मी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांशी मी या विषयावर चर्चा करणार आहे. तसंच मनोज जरांगेंशी जी चर्चा झाली त्या अनुषंगानेही पाठपुरावा करणार आहे.