Ashok Chavan vs Rohit Pawar : भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी भाजपा नेते राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल रविवारी (१३ एप्रिल) नांदेडमध्ये सत्कार केला. यानिमित्त आयोजित सोहळ्यात चव्हाण यांनी भाषण केलं. या भाषणात चव्हाण यांनी राम शिंदेंवर स्तुतीसुमने उधळली. त्याचबरोबर राम शिंदे यांना कर्जत-जामखेड मतदारसंघात सलग दोन वेळा पराभूत करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांवर टीका केली. त्या टीकेला रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अशोक चव्हाण म्हणाले, “राम शिंदे हे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. हा खूप अवघड मतदारसंघ आहे. मध्यंतरी रोहित पवार (स्थानिक आमदार) यांनी मला त्या मतदारसंघात बोलावलं होतं. मी त्या मतदारसंघात गेलो. मात्र, तिथे लोक माझ्याकडे येऊन माझ्या कानात सांगत होते की या ठिकाणी खरा माणूस राम शिंदे आहे. म्हणजेच जनमाणसाचा राम शिंदेंना पाठिंबा आहे.”
रोहित पवारांची अशोक चव्हाणांबाबत नाराजी
चव्हाण यांच्या या वक्तव्यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले, “अशोक चव्हाणजी, विचारधारेशी निष्ठा नसेल तर राजकीय अनुभवाला काहीच अर्थ राहत नाही, ही पुरोगामी विचारधारा मानणाऱ्या आमच्यासारख्या नव्या पोरांची आपल्यासारख्या ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांकडे तक्रार आहे. बाकी, आपल्याबद्दल कायमच आदर आहे, होता आणि राहील. परंतु, अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या भूमिका आणि निष्ठा एवढ्या लवकर बदलतात हे बघून आमच्यासारख्या नव्या पोरांना, कार्यकर्त्यांना दुःख होतं, बाकी काही नाही!”
रोहित पवारांच्या टीकेवर अशोक चव्हाणांचा पलटवार
रोहित पवार एवढ्यावरच थांबले नाहीत. ते म्हणाले, “विधान परिषदेवर अथवा राज्यसभेत जाण्यासाठी मला कोणालाही शरण जावं लागलं नाही हे खरं आहे की नाही, तुम्हीच सांगा असं म्हणत रोहित पवारांनी अशोक चव्हाणांना चिमटा काढला होता. त्यावर आता अशोक चव्हाणांनी पलटवार केला आहे.
मी शरण जाण्याचा प्रश्नच येत नाही : अशोक चव्हाण
अशोक चव्हाण म्हणाले, “माझ्या जिल्ह्यात सभापती आले होते. त्यामुळे त्यांचा यथोचित सन्मान करणे, त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढण्यात वाईट काय? मी त्यांच्याबद्दल चांगलं बोललो तर त्यात कोणालाही वाईट वाटण्याचं कारण नाही. तसेच राज्यसभेत जाण्यासाठी मी शरण जाण्याचा प्रश्नच येत नाही. रोहित पवार कदाचित विसरले असतील की मी यापूर्वी लोकसभेत होते, विधानसभेतही होतो. त्यांचं जेवढं वय आहे तेवढा माझा राजकीय अनुभव आहे.