टिळक स्मारक समितीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात केवळ निमंत्रित लोकांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहिल्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेविषयी शंका उपस्थित केली जात आहे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेत्यांनी, त्याचबरोबर अनेक राजकीय विश्लेषकांनी शरद पवारांच्या या कृतीमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचं म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावर राष्ट्रवादीचा अनेक वर्षांपासूनचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसकडून मोठी प्रतिक्रिया आली आहे. माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी शरद पवार यांना सल्ला दिला आहे. अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे की, शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करून लोकांमधला संभ्रम दूर करावा.

अशोक चव्हाण म्हणाले, अशा कार्यक्रमात सहभागी होणं मला चुकीचं वाटत नाही. एका खासगी संस्थेने घेतलेला हा कार्यक्रम होता. परंतु देशात एकीकडे भाजपाप्रणित एनडीएविरुद्ध सर्व विरोधक येत आहेत. इंडियाच्या बॅनरखाली सगळ्या विरोधी पक्षांची मोट बांधली जात आहे. अशा परिस्थितीत या घटनांमुळे (शरद पवारांच्या अशा कार्यक्रमातील उपस्थितीमुळे) थोडंसं संभ्रमाचं वातवरण नक्कीच निर्माण होतं.

हे ही वाचा >> पंतप्रधानांच्या कार्यक्रमातील शरद पवारांच्या उपस्थितीमुळे जनतेत संभ्रम? अजित पवार म्हणाले…

अशोक चव्हाण म्हणाले, मला वाटतं की शरद पवारांच्या या कार्यक्रमातील उपस्थितीमुळे लोकांमध्ये चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. त्यामुळे पवारांसारख्या अनुभवी नेत्यांनी लोकांमधला संभ्रम दूर करावा. शरद पवारांनी त्यांची भूमिका, जी त्यांनी आधीच घेतली आहे, ती स्पष्ट करून लोकांमधील संभ्रम दूर केला तर अधिक चांगलं होईल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok chavan says sharad pawar should resolve confusion among people about his stand asc