अशोक चव्हाण यांनी असं म्हटलं होतं की इंडिया आघाडीतून लोक बाहेर पडत आहेत कारण ज्या तत्त्वावर इंडिया आघाडी स्थापन झाली ते तत्व राहिलं नाही. याबाबत विचारलं असता संजय राऊत यांनी भाजपा नेते अशोक चव्हाण यांना खरमरीत उत्तर दिलं आहे. १३ फेब्रुवारीला अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला तर १४ फेब्रुवारीच्या दिवशी त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. राज्यसभेची जागा त्यांना लढवायला मिळणार हे अपेक्षित होतंच त्याप्रमाणे ती उमेदवारी त्यांना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी इंडिया आघाडीबाबत वक्तव्य केलं. ज्यावर आता संजय राऊत यांनी बोचरी टीका केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
“अशोक चव्हाणांनी इंडिया आघाडी आणि काँग्रेस पक्ष सोडला आहे. ज्यांच्या कुटुंबाचं सगळं आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं अशा अशोक चव्हाणांनी पक्ष सोडला आहे. ज्यांना सगळंकाही काँग्रेसने दिलं ते काँग्रेस सोडून निघून गेले. तत्वाच्या गोष्टी अशोक चव्हाणांनी करु नये. या परिस्थितीशी जे लोक लढत आहेत त्यांनी तत्वाच्या गोष्टी कराव्यात. अशोक चव्हाणांनी नीतीमत्ता, तत्व, आदर्शवाद या गोष्टी केल्या तर लोक हसतील. त्यामुळे त्यांनी शांत बसावं. त्यांनी जो मार्ग स्वीकारला आहे तो त्यांची मर्जी. कुठल्यातरी भीतीने किंवा नाईलाजाने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.”
आणखी काय म्हणाले संजय राऊत?
देशाच्या राजधानीकडे येण्यासाठी हजारो शेतकरी पंजाब, हरयाणा उत्तर प्रदेश या भागातून निघाले आहेत. त्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर रस्त्यावर खिळे ठोकणं, भिंती उभ्या करणं, अडथळे निर्माण करणं, सशस्त्र पोलीस तैनात करणं हे स्वतंत्र हिंदुस्थानात लोकशाहीने निवडून दिलेल्या सरकारला शोभत नाही” असं संजय राऊत म्हणाले. “शेतकऱ्यांनचा MSP चा विषय आहे. हा फक्त पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांचा विषय नाहीय. देशाच्या शेतकऱ्यांचा विषय आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनात महाराष्ट्र कसा योगदान देऊ शकतो, त्या बद्दल विचार सुरु आहे” असं संजय राऊत म्हणाले.
हे पण वाचा- पिताश्रींच्या पावलावर अशोक चव्हाणांचे पाऊल !
मोदी सरकार ढोंग करतं आहे
“२०१४ पासून सातत्याने मोदी शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे म्हणून मागणी करत होते. ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी अहवाल बनवला, त्यात शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे, म्हणून शिफारस करण्यात आलीय. तुम्ही शेतकऱ्यांच इनकम डबल करणार होता. ज्या स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करु अशी मोदींची भूमिका होती. त्या स्वामिनाथन यांना भारतरत्न दिला, पण त्यांच्या शिफारशी स्वीकारल्या नाहीत, हे ढोंग आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली.