देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून १० दिवसांनी पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडेल. दुसऱ्या बाजूला सर्व पक्षांनी निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. तत्पूर्वी आघाडी आणि युतीत जागावाटप जवळपास पूर्ण झालं आहे. महाराष्ट्रातही महायुती आणि महाविकास आघाडीतलं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, महाविकास आघाडीत सांगली आणि भिवंडी लोकसभेच्या जागेवरून तिढा निर्माण झाला आहे. या दोन्ही जागा गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात आहेत. मात्र महाविकास आघाडीत शिवसेनेच्या ठाकरे गटानं सांगलीच्या जागेवर दावा करत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना येथून उमेदवारी दिली आहे. तर भिवंडी लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाने सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचं राज्यातलं नेतृत्व त्यांच्या या दोन पारंपरिक जागा आपल्याकडे घेऊ शकलं नाही, असं म्हणत राज्यातल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे नुकतेच भाजपात दाखल झाले आहेत. भाजपावासी झाल्यावर चव्हाण यांनीदेखील काँग्रेसच्या राज्यातल्या नेतृत्वावर निशाणा साधला आहे. सांगली आणि भिवंडीची जागा काँग्रेसला मिळाली नसल्यामुळे चव्हाण यांनी राज्यातल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना टोला लगावला आहे

भाजपाचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण म्हणाले, काँग्रेसकडे नेतृत्वाचा आभाव आहे. राज्यात काँग्रेसला केवळ १७ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसची इतकी केविलवाणी परिस्थिती यापूर्वी कधीच झाली नव्हती. राज्यातलं कॉंग्रेसचं नेतृत्व खूप कमकुवत झालं आहे. काँग्रेसच्या हक्काच्या जागा त्यांना मिळाल्या नाहीत. काँग्रेसला त्यांच्या पारंपरिक सांगली आणि भिवंडीच्या जागा सोडाव्या लागतात, यातून पक्षाचं नेतृत्व किती कमकुवत झालंय हे सिद्ध होतं. महाविकास आघाडीत अवघ्या १७ जागांवर काँग्रेसची बोळवण होतेय, हे त्यांच्यासाठी वाईट चित्र आहे.

हे ही वाचा >> “राज ठाकरे हा वाघ माणूस, पण त्यांचा कोल्हा करण्याचा प्रयत्न”; विजय वडेट्टीवार यांचा टोला

सांगलीत काँग्रेस कमकुवत नाही तर पक्षाचं राज्यातलं नेतृत्व कमकुवत आहे, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या राज्यातील प्रमुख नेत्यांना लक्ष्य केलं. चव्हाण यांनी कोणत्याही नेत्याचं नाव घेतलेलं नसलं तरी त्यांचा रोख प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे होता असं बोललं जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok chavan slams maharashtra congress leaders over sangli and bhiwandi lok sabha rno news asc
Show comments