जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. यात अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे संतप्त आंदोलक आता रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्गावर एक खासगी बस आणि राज्य परिवहन महामंडळाची एक बस पेटवली आहे. पोलिसांच्या लाठीचार्जवर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवरील पोलिसांच्या लाठीहल्ल्यावरून आता विरोधक राज्य सरकारला धारेवर धरू लागले आहेत. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.
अशोक चव्हाण यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातल्या अंबड तालुक्यातील सराटी अंतरवाली गावात सुरू असलेलं मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन अमानुष पद्धतीने मोडून काढण्याच्या राज्य सरकारच्या कृतीचा मी तीव्र निषेध करतो. आंदोलनावर पोलिसांनी बेछूट लाठीमार करून अश्रूधुराचाही वापर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या व्हिडीओंमधून बळाचा अतिरेक स्पष्टपणे दिसून येत आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे, मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये. या गंभीर प्रश्नावर केवळ वेळकाढूपणा होत असल्याने समाज संतप्त झाला आहे. बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडता येणार नाही. त्याऐवजी मराठा आरक्षण कसे देणार, याबाबत राज्य सरकारने स्पष्ट भूमिका जाहीर करावी आणि ठोस पावलं उचलावीत. नेमकं हेच केलं जात नसल्याने मराठा समाजातील आक्रोश तीव्र होतो आहे.
हे ही वाचा >> इंडिया आघाडीने मुंबईतल्या बैठकीत घेतले दोन मोठे निर्णय, राहुल गांधी माहिती देत म्हणाले…
काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी इंद्रा साहनी आणि अन्य न्यायालयीन प्रकरणातील ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा शिथिल करण्याची आवश्यकता आहे. याकडे वारंवार लक्ष वेधल्यानंतरही केंद्र आणि राज्य सरकार काहीच करत नसल्याने मराठा समाजावर आरक्षणासाठी पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ ओढवली आहे.