काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आरोप

नांदेड : अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या स्मारकाचे तीनदा भूमिपूजन होऊनही काम सुरू झाले नाही. आता या स्मारकाच्या कामाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने हे स्मारक होऊ नये, अशी सरकारची इच्छा असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी येथे केला.

भाजप व शिवसेनेने छत्रपती शिवाजीमहाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन राज्यात सत्ता मिळवली. अरबी समुद्रात शिवाजीमहाराज यांचे जगातील सर्वात मोठे स्मारक उभारण्याची पोकळ घोषणा या सरकारने केली, परंतु मागील साडेचार वर्षांत तीन वेळा भूमिपूजन करूनही स्मारकाच्या कामाला सरकारने सुरुवात केली नाही. आता या कामाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता या स्मारकाचे काय होणार, असा प्रश्न त्यांनी विचारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचेही काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या दोन्ही स्मारकांचे काम पूर्ण होऊ नये, अशीच सरकारची इच्छा दिसते, असा आरोप त्यांनी केला.

मागील नऊ दिवसांपासून मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यामुळे २५ लाख नागरिक वेठीस धरले गेले आहेत. संपाचा नाहक त्रास सामान्य जनतेला झाला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाने हा संप मिटला असला, तरी गेल्या २५ वर्षांपासून शिवसेना बेस्टला लुटत आहे. मग त्यांनी पुढाकार घेऊन संप का मिटवला नाही, असा प्रश्न उपस्थित करीत खासदार चव्हाण यांनी, केवळ मतांसाठी जनतेचा वापर करायचा आणि निवडणूक संपली की तिकडे दुर्लक्ष करायचे, असा आरोप केला.

जिल्हा नियोजन समितीच्या बठकीला बुधवारी हजेरी लावून खासदार चव्हाण यांनी दुपारी आयटीएम येथे वार्ताहरांशी संवाद साधला. या वेळी आमदार डी. पी. सावंत, अमरनाथ राजूरकर, वसंतराव चव्हाण आदी उपस्थित होते.

Story img Loader