शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखात्याचा कारभार देण्यात आला आहे. एक वर्षापूर्वी अजित पवार यांच्यावर निधी देत नसल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांनी शिवसेनेत बंड केलं होतं. पण, पुन्हा अजित पवारांकडे अर्थखाते आल्याने शिंदे गटातील आमदारांची कोंडी झाल्याचं बोललं जात आहे. यावरून माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी टोलेबाजी केली आहे.
“शिंदे गटातील ४० आमदारांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत यायला हरकत नाही,” असा टोला अशोक चव्हाण यांनी लगावला आहे. ते नांदेडमधील एका कार्यक्रमात बोलत होते.
हेही वाचा : पुन्हा अजित पवारांकडेच अर्थखातं, आता काय? मुख्यमंत्री म्हणतात, “तेव्हा…!”
अशोक चव्हाण म्हणाले, “अजित पवारांकडे असलेल्या अर्थखात्यामुळे आमच्यावर अन्याय झाल्याचं शिंदे गटातील आमदारांनी सांगितलं होतं. त्यामुळे आमदार उद्धव ठाकरे यांना सोडून गेले होते. जे आमदार अजित पवार यांच्यामुळे सोडून गेले. तेच अजित पवार आता पुन्हा अर्थमंत्री झाले आहेत. त्यामुळे आमदारांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे येण्यास हरकत नाही.”
हेही वाचा : “देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याला एकेकाळी…”, ठाकरे गटाची खोचक टीका!
“राजकारण आयपीएल सामन्यासारखं झालं आहे. आयपीएलप्रमाणे बोली सुरु आहे. अपात्रतेच्या कायद्याची पायमल्ली होत आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात तारीख पे तारीख सुरु आहे. माणूस भेटल्यावर सुद्धा विचार करतो की, समोरील व्यक्ती कोणत्या पक्षात आणि गटात आहे. रोज करमणुकीचा कार्यक्रम झाला आहे,” असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं.