Ashok Chavan : महाराष्ट्रात महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे. महायुतीला राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाप्रचंड यश मिळालं. या निवडणुकीत महायुतीला २३० हून अधिक जागा मिळाल्या. महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया या देखील भोकर या मतदारसंघातून आमदार झाल्या आहेत. ही निवडणूक सोपी नव्हती असं अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले अशोक चव्हाण?
अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) म्हणाले, मी जेव्हा निवडणूक लढली होती तेव्हा समीकरणं वेगळी होती. आताची परिस्थिती वेगळी आहे. तेव्हा लोकांचा भर कामांवर होता. मी मतदारसंघात प्रचंड काम केलं आहे. पण फक्त काम चालतं असं नाही. सोशल मीडियावर होणार प्रचार, तिथे आपल्याबद्दल चालणारा अपप्रचार या सगळ्या गोष्टी तरुण वर्ग लक्षात घेतो. तरुण वर्गाच्या आता वेगळ्या अपेक्षा असतात. श्रीजया जेव्हा निवडणुकीच्या रिंगणात होती तेव्हा मी हे देखील पाहिलं की ज्या मंडळींना मीच मोठं केलं, तेच या निवडणुकीत माझ्या विरोधात उभे होते. मला विरोधक नवखा नव्हता. मी पहिली निवडणूक लढलो त्यावेळी विरोधक विरोधी पक्षातले होते. या निवडणुकीत आपणच मोठे केलेले विरोधक होते. असं अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांनी म्हटलं आहे. तसंच रेवंथ रेड्डींचं नाव घेत त्यांनी आपल्याला घेरण्याची पूर्ण तयारी काँग्रेसने केली होती असंही म्हटलं आहे.
हे पण वाचा- काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर सर्वांचा नाना पटोलेंवर रोख; अशोक चव्हाण म्हणाले…
रेवंथ रेड्डींचं नाव घेत काय म्हणाले अशोक चव्हाण?
“तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्याकडे फक्त भोकर मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांचे दोन मंत्री मतदारसंघात तळ ठोकून होते. प्रचंड पैसा वापरला गेला. मला घेरण्याची पूर्ण तयारी काँग्रेसने केली होती. त्यामुळे श्रीजयासाठीच्या ज्या निवडणुकीला आम्ही सामोरे गेलो ती सोपी नक्कीच नव्हती. मला कल्पना होती की काँग्रेसकडून कसा अटॅक होऊ शकतो. कारण मी इतकी वर्षे काँग्रेसमध्ये काढली आहेत. मात्र तेलंगणाचा पूर्ण फोकस माझ्यावर होता. श्रीजया चव्हाण निवडून येऊ नयेत म्हणून अनेक प्रयत्न झाले.” असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. एबीपी माझावरील माझा कट्टा या कार्यक्रमात अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांनी हे वक्तव्य केलं आहे.
मी भाजपात जाण्याचा निर्णय अचूक आहे-अशोक चव्हाण
मी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला तो अचूक आहे हे मला माहीत होतं. लोकसभेच्या निवडणुकीनंतर काही चांगले लोक भाजपातून पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. लोकांना वाटलं की सामाजिक समीकरण असंच राहिल. मात्र मी अनुभवाने सांगतो की लोकसभा आणि विधानसभा यामध्ये महाराष्ट्राने नेहमी फरक केलेला आहे. आत्ताही तसंच घडलं. लोकसभेला या मतदारसंघात कमी लीड होता. सध्याच्या घडीचा लीड पाहिला तर ३९ हजारांचा लीड होता. ही परिस्थिती तीन महिन्यांतच बदलली असं अशोक चव्हाण म्हणाले.