Maharashtra Former CM Ashok Chavan Resigned from Congress : ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. अशोक चव्हाणांच्या या कृतीमुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तर, परिणामी महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, अशोक चव्हाणांचा हा निर्णय अजित पवारांच्या बंडखोरीवेळीच झाला होता, असा मोठा दावा शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवंडे यांनी केला आहे. त्यांनी या संदर्भात एक्सवर पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
अजित पवार यांनी २ जुलै रोजी राष्ट्रवादी पक्षात बंडखोरी करत भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली. अजित पवारांच्या या बंडाची तयारी सुरू होती, तेव्हाच अशोक चव्हाणही काँग्रेसला रामराम ठोकणार असल्याचं स्पष्ट झालं होतं, असं विकास लवंडे म्हणाले. याबाबत ते पोस्टमध्ये म्हणाले की, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, यांनी पक्षाचा आणि विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. याबाबत त्यांची २७ की २८ जून २०२३ रोजी मुंबईत देवगिरी या शासकीय बंगल्यावर गुप्त बैठक झाली.
हेही वाचा >> “अशोक चव्हाण लीडर नव्हे डीलर म्हणणाऱ्या फडणवीसांनी आता त्यांच्याशी डील..”, उद्धव ठाकरेंची टीका
ते पुढे म्हणाले, “देवगिरीवर त्याच दिवशी अजितदादांनी मला बोलावून घेतले होते. दादांची माझी राजकीय सद्यस्थितीबाबत चर्चा चालू असताना अशोक चव्हाण तिथे आले. तेव्हा दादांनी मला आपण नंतर चर्चा करू असे सांगितले व मी तिथून बाहेर पडलो. त्यानंतर त्यांची दोघांची बराच वेळ बंद दाराआड चर्चा झाली होती. अजितदादा आणि अशोक चव्हाण यांचा निर्णय तेव्हाच झालेला होता. त्यानंतर लगेच २ जुलै २०२३ रोजी अजितदादा मित्र मंडळ राज्य सरकारमध्ये सामील झाले.”
“आता अशोक चव्हाण काँग्रेसमधून बाहेर पडले हे पूर्वनियोजित होते. मला त्यात धक्कादायक काहीच वाटत नाही. ते भाजपा किंवा कदाचित अजितदादा गटातसुध्दा जातील. कारण अजितदादा मित्र मंडळ आणि अशोक चव्हाण हे ईडीग्रस्त असल्याने समदुःखी आहेत. जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपासोबत गेलेले बरे. असे सध्या देशभर वातावरण आहे. साम दाम दंड भेद या भाजपाच्या राजनीतीचे देशाला दररोज दर्शन होत आहे. सत्तेचा दुरुपयोग कसा करायचा हे भाजपाने जगाला दाखवून दिले आहे. आपली संसदीय लोकशाही आणि भारतीय संविधान धोक्यात आहे हे नक्की!”, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.
अशोक चव्हाणांनी का दिला राजीनामा?
दरम्यान, अशोक चव्हाणांनी राजीनामा देण्यामागचं खरं कारण अद्यापही जाहीर केलेलं नाही. प्रत्येक कृतीमागे कारणं नसतात असं ते म्हणाले. तसंच, काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद मला चव्हाट्यावर आणायचे नसून मी पक्षात होतो तोपर्यंत मी प्रामाणिकपणे काम केलं. पक्षाने मला भरपूर दिलं, तसंच मीही पक्षासाठी खूप काम केलं, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्यानंतर दिली.