ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल १२ फेब्रुवारी रोजी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. काँग्रेस पक्षासाठी हा सर्वांत मोठा धक्का मानला जात आहे. तसंच, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, ते कोणत्या पक्षात जाणार याबाबत त्यांनी स्पष्ट केलं नव्हतं. परंतु, आज त्यांनी याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.
माध्यमांना प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण म्हणाले, “आज मी माझ्या राजकीय आयुष्याची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करत आहे. आज मी रितसर भाजपात प्रवेश करणार आहे. दुपारी बारा-साडेबारा वाजता पक्षप्रवेश होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अन्य जिल्ह्यांतील संभाव्य प्रवेश होण्याची शक्यता आहे.”
दरम्यान, अशोक चव्हाणांसह काही आमदार जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु, त्यांच्याबरोबर इतर कोणतेही आमदार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं असून या पक्षप्रवेशासाठी मी कोणालाही आमंत्रित केलेलं नसल्याचंही ते म्हणाले. तसंच, काँग्रेसचा राजीनामा दिलेले अमर राजूरकरही आज भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधींनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला का? असा प्रश्न विचारला असता अशोक चव्हाण म्हणाले, “तो विषय आता संपला आहे. यासंदर्भात मी आता तुमच्याशी दुपारी बोलेन.”
लोकांच्या मनात उत्सुकता
“जिल्ह्यातील, मतदारसंघातील बरेच लोक मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात उत्सुकता आहे. नवीन सुरुवात करायची आहे. जिल्ह्यातील समीकरणे आहेत, हे सगळं लक्षात घेऊन पुढील वाटचाल चांगली व्हावी असा प्रयत्न आहे आमचा”, असंही चव्हाण म्हणाले.
विरोधकांना उत्तर देणार का?
“जिथे मी राहिलो तिथे प्रामाणिकपणे काम केलं आहे. भाजपात असतानाही प्रामाणिकपणे काम करेन. माझ्या कामातूनच मी उत्तर देईन” , असं म्हणत अशोक चव्हाणांनी विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष केलं आहे.
हेही वाचा >> राष्ट्रवादी फुटण्याआधीच अशोक चव्हाण भाजपात जाणार होते? सात महिन्यांपूर्वीच ‘देवगिरी’वर खलबतं; शरद पवार गटाचा दावा
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी पक्षाचे सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला. येत्या दोन दिवसांत आपली भूमिका स्पष्ट करू असं ते म्हणाले होते. दरम्यान, आज सकाळपासूनच त्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा सुरू झाली. त्यानुसार, आज ते पक्षप्रवेशासाठी घराबाहेर पडताच माध्यमांनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आजच पक्षप्रवेश होणार असल्याचं अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलं.
मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दीकींपाठोपाठ एक माजी मुख्यमंत्री काँग्रेसमधून बाहेर पडल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीतील उभ्या फुटीनंतर महाविकास आघाडीतील तिसऱ्या पक्षालाही गळती लागल्याचे स्पष्ट झालं आहे. चव्हाणांबरोबर आणखी काही नेते भाजपाच्या वाटेवर असल्याचंही सांगितलं जात आहे.
भाजपात कोणतं पद मिळणार?
अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनी आयुष्यभर काँग्रेसचे काम केले आणि ते गांधी घराण्याशी एकनिष्ठ होते. एका मोठ्या नेत्याला भाजपाने गळाला लावल्यामुळे त्यांचे अनेक समर्थक काँग्रेसमधून फुटण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ काँग्रेसमध्ये राहिलेले राधाकृष्ण विखे-पाटील, कृपाशंकर सिंह, राजहंस सिंह यांना मोठी पदे दिल्याचा इतिहास आहे. आता अशोक चव्हाणांनाही मोठ्या पदाचे आश्वासन दिले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण काय म्हणाले होते?
“मी कालपर्यंत काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम केलं. भाजपामध्ये जाण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. पक्षाने खूप काही दिले, हे मान्य. मात्र मीही पक्षासाठी खूप काही केले आहे. आपण कोणत्याही आमदाराच्या संपर्कात नाही. मात्र इतर काय निर्णय घेतली, हे मला सांगता येणार नाही”, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी काल राजीनामा दिल्यानंतर दिली होती.