नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेसला देण्यात आली. यानंतर काँग्रेसने उमेदवार म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा केली. मात्र, सुधीर तांबे यांनी मुलगा सत्यजीत तांबेंसाठी माघार घेतली आणि मुलाचा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. यानंतर सत्यजीत तांबेंच्या उमेदवारीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. हा वाद सुरू असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

नाशिक पदवीधर मतदारसंघातील फोडाफोडीमागे भारतीय जनता पार्टी असल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी केला आहे. माणसं फोडायची आणि मतं घ्यायची, ही भाजपाची रणनीती आहे, अशी टीकाही चव्हाणांनी केली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा- “रामदेव बाबांवर विनयभंगाचा गुन्हा…”, अमृता फडणवीसांचा उल्लेख करत सुषमा अंधारेंचं टीकास्त्र!

काँग्रेसमधील अंतर्गत वादावर भाष्य करताना अशोक चव्हाण म्हणाले, “नेत्यांमध्ये वाद विवाद नसतात. त्यांच्या काही अपेक्षा असतात. ते पदासाठी इच्छुक असतात. कुणाला पक्षाकडून तिकिट मिळावं, असं वाटत असतं. तर कुणाला अपक्ष निवडणूक लढवायची असते. असे प्रश्न सामजस्यांने सोडवायचे असतात. शेवटी संबंधित जागा जिंकायची असेल तर परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागतो. तिन्ही पक्षाकडून एकत्र प्रयत्न झाले तर संबंधित जागा जिंकणं सोपं असतं.”

हेही वाचा- सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून जिल्हा काँग्रेसमध्येच दुफळी

“विधान परिषद निवडणुकीतही मतं फोडण्याचं काम भाजपानेच केलं आहे. हे काही लपून राहिलं नाही. माणसं फोडून मतं मिळवायची, ही भाजपाची निवडणुकीची रणनीती असते. असाच प्रयोग मागच्या विधान परिषद निवडणुकीत झाला. नाशिकमध्येही तोच प्रयोग भाजपाच्या वतीने काही प्रमाणात झालाय. त्यामुळे नाशिक मतदार संघाचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा, असाच प्रयत्न आहे,” अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.

Story img Loader