जुनी राजकीय समीकरणे जुळणार?
रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदी भाजपा-सेना युतीचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर यांची आज बिनविरोध फेरनिवड झाली. त्यामुळे नगर परिषदेच्या राजकारणातील जुनी राजकीय समीकरणे जुळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मागील नगर परिषद निवडणुकीत युतीने २८ पैकी २१ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. पण दोन्ही बाजूंच्या जास्तीत जास्त सदस्यांना नगराध्यक्षपदाच्या खुर्चीचा लाभ मिळावा, म्हणून प्रत्येकी सव्वा वर्षांचे चार कालखंड ठरवण्यात आले. त्यानुसार शिवसेनेचे सदस्य मिलिंद कीर यांची सव्वा वर्षांची कारकीर्द संपल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर समझोत्यानुसार हे पद भाजपकडे आले. त्यासाठी अनुभवी अशोक मयेकर, माजी उपनगराध्यक्ष महेंद्र मयेकर आणि प्रथमच निवडून आलेल्या नगरसेविका प्रज्ञा भिडे यांची नावे चर्चेत होती, पण भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी अशोक मयेकरांना पसंती दिली. त्यामुळे त्यांची या पदावर फेरनिवड झाली.
यापूर्वी डिसेंबर २००६मध्ये झालेल्या नगर परिषद निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजीचा फायदा उठवत मयेकरांनी नगराध्यक्षपद पटकावले होते. त्यानंतर सभागृहातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजन शेटय़े आणि मयेकर यांच्यातील ‘सामंजस्य’ हा सार्वत्रिक चर्चेचा विषय होते. माजी नगराध्यक्ष उमेश शेटय़े यांच्या विरोधात माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी जोरदार आघाडी उघडली होती. पण शेटय़े आणि मयेकर यांच्यातील जुने सख्य लक्षात घेता नगर परिषदेच्या राजकारणात पुन्हा ही सारी राजकीय समीकरणे जुळून येतील आणि ‘सामंजस्या’ने कारभार चालवला जाईल अशी चिन्हे आहेत.
परंपरागत मतदार नाराज
रत्नागिरीचे नगराध्यक्षपद सध्या खुल्या वर्गासाठी असल्यामुळे त्यावर भाजपचा परंपरागत मतदार असलेल्या ब्राह्मण वर्गातील प्रतिनिधीची निवड व्हावी, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. पण माजी आमदार बाळ माने आणि भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या मतदारांमध्ये नाराजीची भावना आहे. यानंतर पुढील अडीच वष्रे नगराध्यक्ष इतर मागासवर्गीयांसाठी राखीव होणार आहे.
त्यामुळे तेव्हा या वर्गाला प्रतिनिधीत्व मिळू शकणार नाही. अशा प्रकारे भाजप-सेना युतीची सत्ता असूनही पाच वर्षांत परंपरागत मतदारांच्या भावनांची कदर न झाल्याची प्रतिक्रिया पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा