अशोक शहाणे यांची स्पष्टोक्ती
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
संस्कृतमधून अभिव्यक्तीच्या मर्यादा येत असल्यानेच मराठी भाषा जन्मास आली. ज्ञानेश्वरांचे ‘अमृतातेही पैजा जिंके’ हे म्हणणे संस्कृतला उद्देशूनच होते; मात्र त्याबद्दल कुणी अवाक्षरही काढत नाही. त्या काळात संस्कृतमधून व्यक्त होण्याला मर्यादा येत असल्यानेच मराठी भाषा निपजली आणि याचे दाखले चक्रधरांच्या लीळाचरित्रातही आढळतात, असे रोखठोक प्रतिपादन संस्कृ तीविषयक ज्येष्ठ भाष्यकार, लघुअनियतकालिकांचे अध्वर्यू अशोक शहाणे यांनी केले. आपल्याकडे भाषा शिकवण्याकडे अनास्था असल्याचे सांगत शहाणे यांनी भाषाशिक्षण गांभीर्याने होणे गरजेचे असल्याचे मत मांडले. केवळ मराठी भाषा शिकवणाऱ्या शाळा स्थापन करायला हव्यात, अशी सूचनाही त्यांनी या वेळी मांडली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, ठाणे आणि ‘साद’ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी शहाणे यांचे ‘आख्यान’ आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांनी साहित्य, लघुअनियतकालिके, भाषा, अनुवादप्रक्रिया आदी विषयांवर शहाणे यांच्याशी मुक्तपणे संवाद साधला.
जाहीर कार्यक्रमांकडे फारसा ओढा नसणाऱ्या शहाणे यांनी या मुलाखतीत मराठी भाषेविषयीची अनास्था अधोरेखित करत गेल्या सहा दशकांतील मराठी साहित्यव्यवहारावर मार्मिक भाष्य केले. भाषा ही बोलण्याची गोष्ट आहे, लिहिण्याची नाही; त्यामुळे भाषेला लिपी असायलाच हवी असे नाही. उच्चारांवरील लेप म्हणजे लिपी असून ज्याला आपले सांगणे मरणोत्तर उरावे असे वाटते ते लिहिण्याकडे वळतात, असे सांगत शहाणे यांनी स्वत:च्या ‘फारसा न लिहिलेला लेखक’ या ओळखीचे समर्थन केले. अभिव्यक्तीच्या ऊर्मीमुळेच लेखक लिहिता राहतो. अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरच्या मर्यादा हे काही केवळ आजचेच घटित नाही. आपल्याकडे हे नेहमीच घडत आले आहे. अगदी तुकारामांच्या अभंगांच्या वह्य़ा बुडवणे हे त्याचेच उदाहरण आहे, असे मत त्यांनी या वेळी मांडले. ‘लेखकाला राजकीय विचारसरणी असावी का?’ या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, प्रत्येक लेखक हा स्वतंत्र असतो. त्याचप्रमाणे त्याचा वाचकही स्वतंत्र असतो. मात्र राजकीय विचार मांडताना त्यात उथळपणा नसावा. वर्तमानपत्रे-साप्ताहिके आणि साहित्य यांत फरक असायला हवा. पाश्चात्त्य देशांप्रमाणेच व्यक्तिवाद, स्वातंत्र्य या संकल्पना भारतातही फार आधीपासूनच आहेत. मोक्ष ही भारतीय समाजात दबदबा असलेली संकल्पना अत्यंत व्यक्तिनिष्ठ आहे. मात्र या संकल्पनेचा व्यावहारिक अनुभव मात्र निराळाच आहे, असे सांगत आपल्याकडे धर्म आणि आयुर्विमा या बाबी सारख्याच असून दोन्हींचे फायदे मरणानंतरच मिळतात, अशी मार्मिक टिप्पणीही त्यांनी केली.
बंगाली भाषेतून उत्तम साहित्य मराठीत आणणाऱ्या शहाणे यांनी अनुवादप्रक्रियेविषयीचे त्यांचे अनुभवही या वेळी सांगितले. मूळ भाषेची एक शैली असते. ज्या भाषेत अनुवाद करायचा आहे त्या भाषेची स्वतंत्र शैली ओळखूनच अनुवाद व्हायला हवा, असे मत त्यांनी मांडले. बंगाली साहित्याविषयीची साक्षेपी निरीक्षणे नोंदवत शहाणे यांनी बंगालीत जसे रवींद्रनाथ टागोर तसे मराठीत तुकारामांचे स्थान असल्याचे अधोरेखित केले. मात्र मराठी समाजात तुकारामांकडे केवळ भक्तिपर रचना करणारे संत म्हणूनच पाहिले जाते. त्यांच्याकडे कवी म्हणून पाहिले जात नाही. तुकाराम हे मराठीतील अद्याप समकालीन राहिलेले कवी आहेत. त्यांच्या या समकालीन असण्याकडे मात्र फारसे कुणी लक्ष देत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या मुलाखतीत शहाणे यांनी साताऱ्यातील बालपण, तिथे संघाच्या शाखेत जाणे, शाखेत प्रश्न विचारण्यावर बंदी असल्याने शाखेत जाणे सोडून देणे, पुण्यातील शिक्षण, पुढे मुंबईतील नियतकालिकांचे संपादन, लघुअनियतकालिके, ‘आजकालच्या मराठी साहित्यावरील क्ष-किरण’ हा गाजलेला निबंध, भालचंद्र नेमाडेंच्या ‘कोसला’च्या निर्मितीप्रक्रियेचे अनुभव अशा अनेक विषयांवर प्रांजळपणे मनोगत व्यक्त केले. या वेळी कार्यक्रमात साहित्य व माध्यम क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
शहाणे म्हणतात..
* अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरच्या मर्यादा हे आजचेच घटित नाही. तुकारामांच्या अभंगांच्या वह्य़ा बुडवणे हे त्याचेच उदाहरण.
* धर्म आणि आयुर्विमा या बाबी सारख्याच असून दोन्हींचे फायदे मरणानंतरच मिळतात.
* बंगालीत जसे रवींद्रनाथ टागोर तसे मराठीत तुकारामांचे स्थान.