संस्कृती मंच कराडतर्फे स्थापन झालेल्या ‘आम्ही रसिक’ या शास्त्रीय संगीताच्या बैठकीची पहिली मैफल जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या गायनाने संपन्न झाली. अश्विनी भिडे-देशपांडे यांनी मैफलीचा प्रारंभ ‘राग खेमकल्याण’मधील ‘बालमबुवा तुमबीन’ या विलंबित ख्यालाने केली. त्यानंतर ‘पिहरावा’ ही सदारंग यांची पारंपरिक द्रुत बंदिश गायली. जयपूर घराण्याच्या धारदारपणासोबतच मेवाती घराण्याचा सुमधुरपणा त्यांच्या गायकीतून प्रत्ययास येत होता. ख्यालातील सुरेख आलापी, तानांचा दाणेदारपणा त्यामुळे रसिक अगदी मंत्रमुग्ध झाले. त्यानंतर ‘बागेश्री’ रागात ‘माता जगदीश्वरी’ हा विलंबित ख्याल आणि ‘माते शारदे बागेश्वरी’ ही द्रुतची सुंदर आलापी व ढंगदार सरगमसहित सादर केली. राग बिहागडा तसेच राग (अरभी) मधील पारंपरिक बंदिशी व तराना यांच्या सादरीकरणाने रसिक भारावून गेले. मैफलीच्या अंती ‘काहे रोकत श्याम’ ही भरवीतील बंदिश दोन रिषभ व दोन धवतासह लीलया गाऊन मैफल संपन्न केली. त्यास तबल्यावर यती भागवत व संवादिनीवर अनंत जोशी यांनी समर्थ साथ केली. तानपुऱ्यावर शमिका भिडे व मधुरा किरपेकर यांनी संगत केली. कान तृप्त झालेले रसिक स्वरांच्या आभामंडलातच हरवलेले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘आम्ही रसिक’च्या स्थापनेमागचे उद्दिष्ट सांगताना, डॉ. हेमंत ताम्हणकर म्हणाले, की घरगुती मफलीमध्ये कलाकार व श्रोते यांच्यात भेट संवाद घडतो आणि त्यामुळे अशा मैफलीच अभिजात संगीताचा खराखुरा आनंद गायक व श्रोत्यांना प्राप्त करून देतात. ‘आम्ही रसिक’च्या माध्यमातून कराडकर रसिकांना यापुढेही अशा अनेक दिग्गज कलाकारांचे सादरीकरण ऐकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. या वेळी ज्येष्ठ चित्रपट निर्माते व रसिकाग्रणी अरुण गोडबोले यांनी ‘आम्ही रसिक’ परिवाराची स्थापना झाल्याचे जाहीर केले आणि पुढील सांगीतिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संस्कृती मंचच्या अध्यक्ष चारुता ताम्हणकर, डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे, डॉ. अनिल पाटील, रमेश गोखले, बाळासाहेब कुलकर्णी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा