अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा निकाल वर्षभरात लागण्याची शक्यता आहे. मुंबई हायकोर्टाने सत्र न्यायालयाला या खटल्याची सुनावणी वर्षभरात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणामुळे पोलीस दलात खळबळ उडाली होती.
पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांची ११ एप्रिल २०१६ रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला अटक करण्यात आली होती. त्याच्या तीन साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली होती. यातील एक आरोपी राजू पाटील यांच्या जामीन अर्जावर सप्टेंबर महिन्यात मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली होती. हायकोर्टाने जामीन अर्ज फेटाळतानाच कोल्हापूर सत्रन्यायालयालाही आदेश दिले होते. या आदेशाची प्रत बुधवारी संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे.
हायकोर्टाने आदेशात म्हटले आहे की, या खटल्यातील सर्व गोष्टींचा विचार करता खटला लवकर चालवणे अपेक्षित आहे. जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधीशांनी या खटल्याची सुनावणी तातडीने पूर्ण करावी. आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक वर्षाच्या आत या खटल्याची सुनावणी पूर्ण करावी, असे यात म्हटले आहे.
दरम्यान, अश्विनी बिद्रे यांची पती राजू गोरे यांनी सरन्यायाधीशांना निवेदन पाठवले होते. या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
प्रकरण नेमके काय?
एप्रिल २०१६ पासून अश्विनी बिद्रे बेपत्ता झाल्या होत्या. मात्र त्या बेपत्ता झाल्या नसून वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांनी त्यांना बेपत्ता केल्याचा आरोप बिद्रे यांच्या कुटुंबीयांनी केला. अश्विनी बिद्रे या मूळच्या कोल्हापूर येथील आळते गावातील होत्या. २००५ मध्ये त्यांचा विवाह हातकणंगले येथील राजू गोरे यांच्याशी झाला होता. लग्न झाल्यानंतर वर्षभरात त्या स्पर्धा परीक्षा पास झाल्या आणि त्यांना पोलीस उप निरीक्षक पद मिळाले. पद मिळाल्यावर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगलीत झाली. त्याचवेळी अश्विनी यांची ओळख वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्याशी झाली. या दोघांमध्ये जवळीक वाढली होती. २०१३ मध्ये अश्विनी बिद्रेंना बढती मिळाली त्या रत्नागिरीला रुजू झाल्या. रत्नागिरीतही अभय कुरुंदकर त्यांना भेटण्यासाठी जात होता. या दोघांमध्ये जेव्हा वाद होऊ लागले तेव्हा कुरुंदकर यांनी अश्विनी बिद्रेंना गायब करेन अशा धमक्या वारंवार दिल्या होत्या. २०१५ मध्ये अश्विनी यांची बदली नवी मुंबईतील कळंबोलीत झाली. मात्र त्या पोलीस ठाण्यात हजर झाल्याच नाहीत. त्यानंतर त्या गायब झाल्याचे बिद्रे आणि गोरे कुटुंबाला समजले.