चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपने शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जगताप कुटुंबात आनंदच वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून आमदार अश्विनी जगताप आणि शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यात उमेदवारीवरून कलह असल्याचं बोललं जात होतं. यावर अश्विनी जगताप यांनी पडदा टाकत आमच्या दोघांमध्ये कुठलाही कलह नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

हे ही वाचा…भाजपच्या ९९ जणांच्या पहिल्या यादीत पुण्यातील तीन आमदारांना पुन्हा उमेदवारी चंद्रकांत पाटील,माधुरी मिसाळ आणि सिद्धार्थ शिरोळे

अश्विनी जगताप म्हणाल्या, शंकर जगताप आणि माझ्यामध्ये उमेदवारीवरून कधीच वाद नव्हता. महायुती मधून कोणालाही तिकीट मिळाल्यानंतर मी त्याचा प्रचार करणार असल्याचं म्हटलं होतं. भाजप उमेदवार शंकर जगताप यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर महायुतीतील नेत्यांचे आभार मानले. महायुती मधील बंडखोरी बाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तोडगा काढतील असा विश्वास शंकर जगताप यांनी व्यक्त केला आहे. तिकीट मिळेपर्यंत स्पर्धा असते. मात्र, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही स्पर्धा थांबेल असं मत शंकर जगताप यांनी व्यक्त केल आहे. तर दुसरीकडे महायुतीतील घटक पक्षातील अजित पवार गटाचे नाना काटे हे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. काटे दोन दिवसात त्यांची भूमिका स्पष्ट करणार असल्याच म्हटलं आहे.