अमरावतीमधील अचलपूर पोलीस स्थानकामधील एका पोलिस अधिकाऱ्याचा गांजा तस्करांनी पोलीस स्थानक परिसरातच निघृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांतीलाल पटेल यांनी आज पहाटे चारच्या सुमारास पोलीस स्थानक परिसरातच गांजा तस्करी करणाऱ्यांना हटकले असता त्यांच्यावर गांजा तस्करांनी लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पटेल यांचा मृत्यू झाला. पोलीस स्थानक परिसरातच पोलीस अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल पुन्हा एका प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
हा हल्ला झाल्यानंतर पटेल यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. रॉड गांजा तस्करांनी पटेल यांच्या शरिरात खुपसल्याने अती रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी अचलपूर पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली आहे. अमरावती शहरामध्ये अशाप्रकारे पोलिसांवर जीवघेणा हल्ला होण्याची ही काही पहिली वेळ नाही. तीन महिन्यांपूर्वी सचिन मडावी या पोलीस अधिकाऱ्याची अशाच प्रकारे हत्या करण्यात आली होती. वारंवार होणाऱ्या अशा हल्ल्यांमुळे नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी असणारे पोलिसच अमरावती शहरात सुरक्षित नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शहरामध्ये गांजा तस्करी करणाऱ्यांची गुंडागर्दी वाढल्याचे चित्र दिसत आहे. पोलिस अधिकाऱ्यांची हत्या करण्यापर्यंत गांजा तस्करांची मजल गेली असल्याने आता पोलिस या गांजा तस्करांविरुद्ध कशाप्रकारे कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.