मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील १६ आमदारांच्या अपत्रातेबाबत कालमर्यादा निश्चित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले होते. पण, अपात्रतेबाबत कारवाई करण्यासाठी लागेल तेवढा वेळ घेणार. त्यासाठी कोणतीही संस्था मला रोखू शकत नाही, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं होतं. यावर वकील असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राहुल नार्वेकर काय म्हणाले?
“सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान राखला जाईल. पण, कोणत्याही प्रकारची घाई अपत्रातेबाबतच्या निर्णयासाठी करणार नाही. घटनात्मक तरतुदी आणि विधानसभा अपात्रतेच्या नियमांचा विचार करून योग्यरित्या निर्णय घेऊ. याने कुणावरही अन्याय होणार नाही आणि प्रत्येकाला बाजू मांडण्याची संधी दिली जाईल. मी घेतलेला निर्णय नियमबाह्य आणि घटनाबाह्य नसेल. संविधानाने दिलेल्या तरतुदीनुसार असणार आहे. त्यासाठी लागेल तेवढा वेळ मी घेणार आहे. कोणतीही संस्था मला रोखू शकत नाही,” असं विधान राहुल नार्वेकर यांनी केलं होतं.
हेही वाचा : शरद पवार अन् बाळासाहेब ठाकरेंचा फोटो शेअर करत सुप्रिया सुळेंची भाजपावर टीका; म्हणाल्या…
“…याचा गैरफायदा विधानसभा अध्यक्ष घेत आहेत”
यावर असीम सरोदे म्हणाले, “संवैधानिक तरतुदीनुसार न्यायालय विधानसभा अध्यक्षांना वेळेची मर्यादा घालू शकत नाही. विधानसभेच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा अधिकार न्यायालयाला नाही. याचा गैरफायदा विधानसभा अध्यक्ष घेत आहेत. सर्वोच्च न्यायालय आपल्याला आदेश देऊ शकत नाही, हे नार्वेकरांना माहिती आहे.”
“नार्वेकर अपात्रतेबाबतच्या सुनावणीची तारीख निश्चित करतील”
“पण, त्यादिवशी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, ‘विधानसभा अध्यक्ष बेकायदेशीर वागण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्यांच्या कामकाजाचे विश्लेषण करण्याचा अधिकार आम्हाला आहे.’ त्यामुळे २८ किंवा २९ तारखेला राहुल नार्वेकर अपात्रतेबाबतच्या सुनावणीची तारीख निश्चित करतील,” असं सरोदे यांनी म्हटलं.
हेही वाचा : “माझ्याकडील अर्थखातं पुढं टिकेल, नाही टिकेल सांगता येत नाही, पण…”, अजित पवारांचं विधान
“पैशांचा खेळ जास्त दिवस चालणार नाही”
“राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत आहेत. कारण, त्यांना संविधान मानायचं नाही. पळून गेलेल्या आमदारांना लोकांनी मनातून अपात्र केलं आहे. त्यामुळे आमदारांना निवडणूक अत्यंत कठीण जाणार आहे. पैशांचा खेळ जास्त दिवस चालणार नाही. हे भारतीय लोकशाही दाखवून देईल,” असंही सरोदे यांनी सांगितलं.