अलिबाग- नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत काय कामे केले असा सवाल उद्धव ठाकरे जनसंवाद मेळाव्यांच्या निमित्ताने विचारत आहेत. पण त्यांनी हा प्रश्न शेजारी बसलेले अनंत गीते यांना विचारणे गरजेचे आहे. कारण २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या कालावधीत गीते हे नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात होते. ठाकरेंनी हा प्रश्न गीते यांना तेव्हाच विचारला असता तर गीतेंना रायगडच्या लोकांनी का नाकारले याचे उत्तर तेव्हाच मिळाले असते, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिले. ते उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अलिबाग येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
उद्धव ठाकरे यांच्याकडून माझ्यावर घराणेशाहीचे आरोप केले जात आहेत. पण माझ्यावर असा आरोप करण्याचा नैतिक अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही. कारण महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे मंत्रिमंडळात होता. माझी मुलगी आदिती कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे राजकारणात आली. तीने आपले कर्तुत्व सिद्ध केले. श्रीवर्धन मतदारसंघातून ४० हजारांचे विक्रमी मताधिक्य घेऊन ती विधानसभेवर निवडून आली. मुलगा अनिकेतही विधानसभेवर आमची मते कमी असताना निवडून आला. त्यामुळे दोघेही गुणवत्तेवर राजकारणात प्रस्थापित झाले आहेत. त्यामुळे माझ्यावर घराणेशाहीचा आरोप उद्धव ठाकरे यांनी करणे हास्यास्पद आहे.
हेही वाचा – सांगली : ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून एक कोटीचा गंडा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला तेव्हा काही जणांनी अल्पसंख्याक समाजात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला, पण एनडीएत सहभागी झालो असलो तरी आम्ही आमच्या पक्षाचा धर्मनिरपेक्ष विचार सोडलेला नाही. उलट या सहा महिन्यांच्या कालावधीत अल्पसंख्याक समाजाचे अनेक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे राज्यभरातील अल्पसंख्याक हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आकृष्ट होत आहे. त्यामुळे सभा ऐकण्यासाठी अल्पसंख्याक समाज आला म्हणजे त्याचे रुपांतर मतांमध्ये होईल असे नाही.
जिल्ह्यात महायुतीची ताकद वाढली आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांना प्रत्येक मतदारसंघांत जनसंवाद सभा घेण्याची वेळ आली आहे. एकट्या श्रीवर्धन मतदारसंघात त्यांनी तीन तालुक्यांत सभा घेतल्या आहेत. ठाकरे यांनी राजकीय टीका टिप्पण्याकरण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यांवर बोलावे. जिल्ह्यात होत असलेली विकास कामे आमच्या कामाची पोहोचपावती आहेत. अनंत गीते आजवर ज्यावेळी लोकसभेवर निवडून आले त्यावेळी भाजप हा विश्वासू सहकारी म्हणून त्यांच्या सोबत होता. त्यामुळे गीतेंच्या विजयात प्रत्येक वेळी भाजपची मोठी भूमिका होती. यावेळी भाजप त्यांच्या सोबत नाही याची जाणीव त्यांनी ठेवावी, असा टोला लगावला.
महायुतीच्या जागा वाटप लवकरच होईल. यात रायगडची जागा मिळावी असा आमचे नेते अजित पवार यांचा आग्रह आहे. रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आणि अजित पवार यांनी मला ती लढवण्यास सांगितली तर मी नक्की तयार आहे. मी मागे हटणार नसल्याचेही तटकरे यांनी जाहीर केले. या पत्रकार परिषदेला अमित नाईक, चारूहास मगर उपस्थित होते.