मंगळवारी प्रदेश काँग्रेसच्या वतीने विधानसभा निवडणुकीतील इच्छुकांच्या मुलाखती मुंबईत पार पडल्या त्यात प्रदेश प्रवक्ते बसवराज पाटील नागराळकर यांनी व्यक्त केलेली खंत सर्वानाच अंतर्मुख करायला लावणारी ठरली.
काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते बसवराज पाटील नागराळकर यांनी निलंगा विधानसभा मतदारसंघासाठी मुलाखत दिली. ते म्हणाले, की गेल्या अनेक वर्षांपासून मी निवडणुकीसाठी मुलाखती देत आहे. मला सातत्याने डावलले जाते याचा दोष निवड समितीला न देता मी माझ्या वडिलांना देतो. उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे पहिले सभापती म्हणून त्यांच्या कामाचे राज्यभर कौतुक झाले. पी. के. सावंत यांनी त्यांना आपले बाजार समितीचे काम पाहून आम्ही विधान परिषद सदस्य म्हणून आपली निवड करण्याचे निश्चित केले आहे. कृपया संमती कळवावी, असे पत्र दिले होते. तेव्हा वडिलांनी आपले शिक्षण केवळ चौथी पास असल्यामुळे या पदाला आपण न्याय देऊ शकत नाही, असे कळवले होते. त्यांनी चूक केली नसती तर ते आमदार राहिले असते व त्यानंतर मी मंत्री म्हणून काम करू शकलो असतो. कारण आमदारांचा मुलगा आमदार हाच जर निकष असेल तर इतरांना संधी कशी मिळेल? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत आपल्याला संधी मिळाली नाही, याचे आपल्याला फारसे वाईट वाटत नाही. मात्र, मुलाखती दरम्यान आपल्याला थेट ‘जात’ कोणती हा प्रश्न विचारला गेला याची मात्र जरूर खंत वाटत असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर मुलाखती दरम्यान सर्वाचेच चेहरे बघण्यासारखे झाले होते.
गेल्या ५० वर्षांपासून निलंगा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनीच आपल्याला या वेळी उमेदवारीची संधी द्यावी. माझ्यानंतर वारसा मी त्यांचे पुत्र अशोक पाटील निलंगेकर यांच्याकडेच सुपूर्द करेन, असे ते म्हणाले. अर्थात, जातीच्या गणितात बसवराज पाटील नागराळकर हे बसू शकत नसल्यामुळे पुन्हा याही वेळी त्यांना संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट आहे. जिल्हय़ातील औसा विधासभा मतदारसंघात आ. बसवराज पाटील मुरूमकर यांना पुन्हा संधी मिळणार असल्यामुळे एका जिल्हय़ात दोन ‘लिंगायत’ उमेदवार हे गणित तोटय़ाचे राहील हे गृहीत धरण्यात येणार आहे.
लातूर शहर मतदारसंघात आ. अमित विलासराव देशमुख व माजी आ. शिवाजी पाटील कव्हेकर यांच्या मुलाखती झाल्या. लातूर ग्रामीण मतदारसंघातून आ. वैजनाथ शिंदे, विक्रम गोजमगुंडे, शिवाजी पाटील कव्हेकर, विक्रम हिप्परकर यांसह अनेक इच्छुकांनी अपेक्षा व्यक्त केली. अहमदपूर मतदारसंघातून मात्र एकमेव माजी जि. प. सदस्य अनसूयाताई करड यांनी मुलाखत दिली.

Story img Loader