सध्या देशभरात अनेक ठिकाणी भाजीपाल्याचे भाव गगनाला भीडत आहेत. दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी भाज्यांच्या दरवाढीसाठी मियां (मुस्लीम) व्यापारी जबाबदार आहेत, असं विधान केलं आहे. सरमा यांना आसाममधील भाज्यांच्या वाढत्या दराबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. गुवाहाटीमध्ये भाज्या इतक्या महाग का आहेत? असा प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री सरमा म्हणाले, “हे मियां व्यापारी आहेत, जे चढ्या भावाने भाजीपाला विकत आहेत.”
‘बीबीसी’ने दिलेल्या वृत्तानुसार, आसाममध्ये बंगाली वंशाच्या मुस्लिमांसाठी ‘मियां’ हा शब्द वापरला जातो. आसाममध्ये बंगाली वंशाच्या मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणात असून ते प्रामुख्याने भाजीपाला आणि मासे विक्रीचा व्यवसाय करतात. अशा स्थितीत सध्या आसाममध्ये भाज्यांचे भाव प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे आसाम सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. भाज्यांच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे.
हेही वाचा- “शिंदे गटातील आमदारांच्या जखमेवर मीठ चोळून…”, खातेवाटपावरून एकनाथ खडसेंची टोलेबाजी!
दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी भाज्यांच्या दरवाढीसाठी मियां-मुस्लिमांना जबाबदार धरलं आहे. महागड्या भाज्यांबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, “भाज्यांच्या दरवाढीमागे मियां (मुस्लीम) व्यापारी आहेत. हे मियां व्यापारी चढ्या दराने भाजीपाला विकतात. ग्रामीण भागात भाज्यांचे भाव खूपच कमी आहेत. आज राज्यात आसामी व्यापारी भाजी विकत असते तर त्यांनी आसामी लोकांकडून जास्त उकळले नसते. मात्र मियां व्यापारी आसामी लोकांकडून जास्त पैसे घेत आहेत.”
हेही वाचा- राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर; कोणत्या नेत्याकडे कोणती जबाबदारी? संपूर्ण यादी
सरमा यांनी आसाममधील तरुणांना भाजीपाला विक्रीच्या व्यवसायात पुढे येण्याचा सल्ला दिला आहे. आसामी तरुणांची भाजी विकायची तयारी असेल तर त्यांना जागा मिळेल, असंही ते म्हणाले. एवढंच नव्हे तर मियां व्यापारी ज्या उड्डाणपुलाखाली भाजीपाला आणि फळे विकतात, ती जागा रिकामी करण्याबाबतही सरमा यांनी भाष्य केलं आहे.