सोलापूर: आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊन आठवडा सरत असताना प्रत्यक्षात अंमलबजावणीत गोंधळ दिसून येतो. त्याचे मासलेवाईक उदाहरण एसटी महामंडळाच्या बसेसमधून समोर आले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी एका राजकीय पक्षाने उमेदवारी जाहीर केलेल्या एका नेत्याची छबी एसटी बसमध्ये प्रवाशांना दिसेल, अशा दर्शनी भागावर पाहायला मिळाली.
सांगोला ते हैदराबाद या एसटी बसमधून दुपारी प्रवास करताना त्या बसमध्ये एसटीचालकाच्या पाठीमागे आणि प्रवाशांबरोबर दर्शनी भागावर ठळकपणे दिसून येईल, अशी एक छबी पाहायला मिळाली. काही प्रवाशांनी ती ओळखली आणि त्यांना आश्चर्य वाटले. कारण ती छबी सोलापूर जिल्ह्यातील एका विधानसभा मतदारसंघातून एका राजकीय पक्षाने उमेदवारी जाहीर केलेल्या नेत्याची होती. मध्यभागी मोठ्या आकारात त्या उमेदवाराचा चेहरा तर त्याच्या दोन्ही बाजूस देवदेवतांच्या प्रतिमा दिसत होत्या.
हेही वाचा…कणकवली मतदारसंघात श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे नावांचा उल्लेख करत झळकले बॅनर
एकीकडे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच सार्वजनिक ठिकाणी असलेले राजकीय पक्षांच्या आणि पुढाऱ्यांच्या छबी असलेले फलक, फ्लेक्स, निरनिराळ्या राजकीय पक्षांचे व अन्य संघटनांचे झेंडे झटपट खाली उतरविण्यात आले असताना किंवा त्या फलकांवर कापड झाकण्यात आले आहेत. याबाबत आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. परंतु या एसटी बसमध्ये एका राजकीय पक्षाची उमेदवारी घोषित झालेल्या पुढाऱ्याची छबी कशी झळकली, याची उत्सुकता वाढली. त्याबाबत संबंधित बसचालकाकडे विचारणा केली असता, ही एकच एसटी बस नाही, तर अशा बारा बसेसमधून संबंधित उमेदवार नेत्याच्या तसबिरी लटकावण्यात आल्याची माहिती समोर आली. त्याचे कारण पुढे करताना, संबंधित राजकीय नेत्याने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी, आपल्या पक्षाची उमेदवारी जाहीर होताच मतदारांना बारा एसटी बसेसमधून कोल्हापूर व अन्य भागात देवदर्शन घडवून आणले होते. त्यावेळेस आणलेल्या सर्व बारा बसेसमध्ये त्या पुढाऱ्याच्या तसबिरी लावल्या होत्या, असा खुलासा झाला. परंतु निवडणूक आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू असताना एसटी बसेसमधील त्या उमेदवार नेत्याच्या छबी वेळीच काढण्यात आल्या कशा नाहीत, हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे.