राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? याबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे आयोगाच्या कार्यपद्धतीबद्दल कुठलीही शंका असण्याचं कारण नाही. कायद्यानुसार निर्णय घेतला जाईल, याची खात्री आहे. संस्थेला काम करण्याची मुभा दिली पाहिजे, असं मत राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केलं. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आमदार अपात्रतेप्रकरणी १३ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याबद्दल विचारल्यावर राहुल नार्वेकर म्हणाले, “याचिका दाखल केल्यानं सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलं की, संविधान शिस्त पाळली पाहिजे. संविधानाप्रमाणे विधिमंडळ, न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ समान आहे. तिन्ही आपल्या कार्यक्षेत्रात काम करतात.”
हेही वाचा : “भाजपकुमार थापाडे”, देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ VIDEO शेअर करत मनसेची खोचक टीका
“सर्वोच्च न्यायालय आपल्यासमोरील याचिकांवर निर्णय घेईल. एखादा निर्णय घटनाबाह्य असेल, तर सर्वोच्च हस्तक्षेप करू शकते. पण, तसं काही नसेल, तर सर्वोच्च न्यायालय अन्य कामकाजात हस्तक्षेप करणार नाही. हीच संवैधानिक शिस्त आहे,” असं राहुल नार्वेकरांनी म्हटलं.
हेही वाचा : कोल्हापूरमध्ये भाजपला मित्र पक्षांचीच पालखी वाहावी लागणार?
अपात्रतेप्रकरणी वेगळीवेगळी विधान केली जातात. कुठेतरी दबाव आहे का? याप्रश्नावर राहुल नार्वेकरांनी म्हटलं, “सभागृहाच्या बाहेर केलेल्या आरोपांवर मी लक्ष देत नाही, हे आधीही सांगितलं आहे. निर्णय प्रक्रियेवर दबाव टाकण्यासाठी आरोप होत असेल, तर मी प्रभावित होणार नाही. माझ्या निर्णय प्रक्रियेत कुठलाही फरक पडणार नाही. ज्यांना संविधानाचं ज्ञान नाही, असे लोक आरोप करतात.”