अधिवेशनाच्या आधी सर्व गटनेत्यांशी चर्चा करण्याची संसदेतील प्रथा राज्यातही सुरू करण्यात आली असून, येत्या सोमवारपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरुळीत चालण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी बुधवारी केले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदारांकडून पोलीस उपनिरीक्षकाला झालेली मारहाण, सभागृहातील गोंधळ या पाश्र्वभूमीवर अध्यक्षांनी सर्व गटनेत्यांची बैठक बोलाविली होती. सभागृहाचे कामकाज उत्तम रितीने चालावे तसेच दर्जा उंचवावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. अधिवेशनात अनेकदा प्रश्नोत्तराचा तास गोंधळात वाया जातो. सदस्यांनी विचारलेले प्रश्न हे राज्य आणि नागरिकांच्या हिताचे असतात. अशा वेळी प्रश्नोत्तराचा तास वाया जाऊ नये, असे मतही अध्यक्षांनी मांडले. चर्चा आणि लक्षवेधीचा दर्जाही अधिक चांगला असावा तसेच गोंधळ कमी व्हावा यावरही भर देण्यात आला.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधक बहुतांशी वेळा बहिष्कार घालतात. यामुळेच अधिवेशनाच्या आधी सर्व गटनेत्यांशी चर्चा करण्यात येत आहे. सर्व गटनेते आजच्या बैठकीला उपस्थित राहू न शकल्याने अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा बैठक घेण्यात येणार आहे.
हक्काभंगावर परिसंवाद
हक्कभंगाच्या सूचनेवरून सध्या उलटसुलट चर्चा होते. या आयुधाचा आमदारांकडून गैरवापर केला जातो, असा आक्षेप घेतला जातो. हक्कभंगासाठी कोणतीही संहिता नाही. या पाश्र्वभूमीवर हक्कभंगाबाबत आमदारांना माहिती करून देण्यासाठी मंगळवारी विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आल्याचे अध्यक्ष वळसे-पाटील यांनी सांगितले. लोकसभेचे निवृत्त सचिव सुभाष कश्यप, राज्याचे महाधिवक्ता दरायस खंबाटा, अ‍ॅड. आशुतोष कुंभकोणी हे सहभागी होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा