PM Modi : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने दाखवून दिले की…”, विधासभेतील मोठ्या विजयानंतर मोदींची विरोधकांवर टीका

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान मोदी यांनी महायुतीच्या नेत्यांचे कौतुक केले आहे.

PM Modi
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी महायुतीच्या नेत्यांचे कौतुक केले आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

PM Modi On Assembly Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आज (२३ नोव्हेंबर) रोजी जाहीर झाला. विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत झाल्याचे पाहायला मिळाले, ज्यामध्ये महायुतीला मोठं यश मिळालं तर महाविकास आघाडीला मोठा पराभव झाला आहे. महायुतीच्या उमेदवारांचा २३० हून अधिक जागांवर विजय मिळाला आहे. या दमदार विजयानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या नेत्यांचे कौतुक केले असून महाराष्ट्रातील जनतेचे देखील आभार मानले आहेत.

महाराष्ट्रात सुशासनाचा विजय झाला असून घराणेशाहीचा पराभव झाल्याचे मोदी म्हणाले. भाजपाच्या दिल्लीतील मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की, “आपण एका ऐतिहासिक महाविजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी जमलो आहोत. आज महाराष्ट्रात विकासवाद, सुशासन आणि सामाजिक न्यायाचा विजय झाला आहे. तर विभाजनकारी शक्ती, नकारात्मक राजकारण आणि घराणेशाहीचा पराभव झाला आहे. आज महाराष्ट्राने विकसीत भारताच्या निश्चयाला बळ दिले आहे. यासाठी मी भाजपा, एनडीएच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो”. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील महायुतीचे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे कौतुकदेखील केले.

“उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानने भाजपाला मोठा पाठिंबा दिला आहे. मध्य प्रदेश, बिहारमध्येही एनडीएला पाठिंबा मिळाला आहे. यातून दिसून येतं की देशाला फक्त आणि फक्त विकास हवा आहे”, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

“तुष्टीकरणाचा सामना कसा करावा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने आज दाखवून दिले. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे अशा महान लोकांच्या राज्याने जुने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले.गेल्या ५० वर्षात कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीसाठी हा सर्वात मोठा विजय आहे”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

“आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे लागोपाठ तिसऱ्यांदा झालं आहे की, भाजपाच्या नेतृत्वाखालील युतीला सलग महाराष्ट्राच्या जनतेन आशीर्वाद देत विजयी केले आहे.भाजपा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरण्याची देखील ही तिसरी वेळ आहे. हे निश्चितपणे ऐतिहासिक आहे. फक्त भाजपाला काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांपेक्षी कितीतरी जागा महाराष्ट्राच्या जनतेने भाजपाला दिल्या आहेत. सुशासनाच्या मुद्द्यावर देश फक्त भाजपावर आणि एनडीएवर विश्वास ठेवतो हे दिसून येते”, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

हेही वाचा>> Devendra Fadnavis : विधानसभेचा निकाल पाहून फडणवीसांना विश्वास बसेना, ‘त्या’ वक्तव्याची चर्चा, मुख्यमंत्रिपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

“महाराष्ट्र देशातील सहावे राज्य आहे ज्याने भाजपाला लागोपाठ तीन वेळा बहुमत दिले आहे. यापूर्वी आपण गोवा, गुजरात, छत्तीसगड, हरियाणा आणि मध्यप्रदेश येथे लागोपाठ तीन वेळा विजयी झालो आहोत. बिहारमध्येदेखील एनडीएने तीन वेळा विजय मिळवला आहे. हा आमच्या सुशासनाच्या मॉडेलवरील विश्वास आहे”, असेही मोदी यावेळी म्हणाले. हरियाणानंतर महाराष्ट्र निवडणुकीचा देखील एकजुटता हाच संदेश असल्याचे सांगत पंतप्रधान मोदींनी ‘एक है तो सेफ है’ अशी घोषणा दिली.

“महाराष्ट्राच्या भूमीत अनेक विभूतींनी जन्म घेतला आहे. भाजपा आणि माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज अराध्य पुरूष आहेत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आमची प्रेरणा आहेत. आम्ही नेहमीच बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक न्यायाच्या कल्पनेचा आदर केला आहे. मराठी भाषेसाठी आमचे प्रेम देखील लोकांनी पाहिले आहे”, असेही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Assembly election result pm modi on vidhan sabha election result mahayuti performance bjp congress shivsena ncp rak

First published on: 23-11-2024 at 21:24 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या