सांगली : इतना सन्नाटा क्यो है भाई? अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघात शनिवारी दुपारपासून केली जात आहे. मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणाऱ्या या मतदारसंघात ना फटाक्यांचे आवाज, ना गुलालाची उधळण, ना जल्लोष. या उलट आ. पाटील यांचे मूळगाव कासेगावचा समावेश असलेल्या शिराळा मतदारसंघामध्ये भाजपचा जोरदार जल्लोष सुरू आहे. आ. पाटील यांचा गेल्या सात निवडणुकांमध्ये झालेला दणदणीत विजय आणि यावेळी झालेला निसटता विजय आणि शिराळ्यातील पराभव जिव्हारी लागणारा ठरला आहे.
पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या उपस्थितीत आ.पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. त्यावेळी राज्यातील सर्वोच्च जबाबदारी या तालुक्याला देण्याचे सूतोवाच झाले. प्रचारादरम्यान, खा. अमोल कोल्हे यांनीही राज्याचे नेतृत्व आ. पाटील यांच्या हाती सोपवले जाऊ शकते यामुळे जास्तीत जास्त आमदार जिल्ह्याने द्यावेत, असे आवाहन केले होते. यामुळे वाळवेकरांना मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पडू लागली होती.
हेही वाचा >>>संख्याबळाला मान की शिंदेंचा सन्मान?
स्वप्ने सत्यात उतरण्याची वेळ आली. सकाळी मतमोजणी सुरू झाली. मात्र प्रत्येक फेरीला मतामधील अंतर कमी अधिक होत होते. एकवेळ तर अशी आली की विरोधी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) निशिकांत भोसले-पाटील यांनी आघाडी घेतली. कमी अधिक होत होत अखेरच्या फेरीत आमदार पाटील यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होत असताना लाखाचे मताधिक्य सांगण्याची सवय असलेल्या वाळवेकरांची जीभ अवघे १३ हजार २६३ चे मताधिक्य सांगताना अडखळू लागली. यामुळे मिळालेला विजयाचा आनंदही साजरा करता येईना झाला आहे.
महायुतीने सुरुवातीपासूनच या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले होते. जागा वाटपात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला जागा देत असताना निशिकांत भोसले-पाटील या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनाच उसनवारीवर दिले. महायुतीतील, भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर येणार नाहीत, समन्वयाने प्रचार होईल याची दक्षता घेतली. राज्यभर प्रचारासाठी फिरावे लागणार असे सांगणाऱ्या आ. पाटील यांना मतदारसंघातच अडकवून ठेवण्याची महायुतीची रणनीती यशस्वी ठरली. उपमुख्यमंत्री पवार यांनी इस्लामपूर व आष्टा येथे प्रचार सभा घेत ऊसदराचे गौडबंगाल बाहेर काढत साखर उताऱ्यानुसार दर मिळत नाही, दिवाळीला पैसे मिळत नाहीत. प्रतिटन २०० रुपये कुणाच्या खिशात जातात असा सवाल करत खपली काढली. यातून ऊस उत्पादकांची नाराजी मतांच्या रूपाने बाहेर पडली.
हेही वाचा >>>महायुती ‘सव्वादोनशे’र!
शेजारी असलेल्या शिराळा मतदारसंघात आ. पाटील यांचे वर्चस्व असलेली ४८ गावे समाविष्ट आहेत. तरीही भाजपला या ठिकाणी २२ हजार ६२४ मतांची आघाडी मिळाली. निवडून आलेले भाजपचे सत्यजित देशमुख हे आ. पाटील यांचे साडू असले तरी त्यांची नाळ आता भाजपशी जोडली गेली आहे. इस्लामपुरातील प्रचाराची धुरा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील व राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार पुत्र प्रतीक पाटील यांच्या हाती असतानाही अल्प मतातील विजय इस्लामपूरकरांना पचणारा निश्चितच मानता येणार नाही.