सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच स्थानिक पायाभूत विकासाच्या प्रश्नावर शासनाचे आणि राजकीय पक्षांचे लक्ष वेधण्यासाठी काही गावांमध्ये निवडणूक मतदानावर बहिष्कार घालण्याची इशारेबाजी सुरू झाली आहे. मोहोळ तालुक्यातील हराळवाडी ग्रामस्थांनी पाण्याच्या प्रश्नावर मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिल्यामुळे त्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे.

हराळवाडी गावात ग्रामपंचायतीच्या मालकीची पाणीपुरवठ्यासाठीची कूपनलिका तीन महिन्यांपूर्वी जळाली आहे. त्याची दुरुस्ती होण्यासाठी ग्रामस्थांनी वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून ग्रामस्थांची पाहण्यासाठी परवड होत आहे. विशेषतः लाडक्या बहिणी म्हणून महायुतीकडून संबोधल्या जाणाऱ्या महिलांना पाण्यासाठी दूर अंतरापर्यंत भटकंती करावी लागत आहे. डोक्यावर पाण्याचे भांडे घेऊन घराकडे येताना महिलांना मानेचे दुखणे सहन करावे लागत आहे. सुमारे तीन हजार लोकसंख्येच्या हराळवाडी गावात पाण्याचे ठोस स्रोत उपलब्ध नाही. ग्रामपंचायतीसमोर असलेली एकमेव कूपनलिका गावाची तहान भागविते. मागील वर्षी राष्ट्रीय पेयजल योजनेच्या दुरुस्तीसाठी प्राप्त झालेल्या २८ लाख रुपयांच्या निधीतून नवीन जलवाहिनी योजना हाती घेण्यात आली होती. परंतु ठेकेदाराने प्रशासनाबरोबर हातमिळवणी करून जुनी कालबाह्य जलवाहिनीची दुरुस्ती केली. ही जुनी जलवाहिनी गळती लागल्यामुळे पुन्हा बंद पडली आहे. त्यात भर म्हणून ग्रामपंचायत कार्यालयासमोरील एकमेव कूपनलिकाही जळाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी चक्क तीन ते चार किलोमीटर अंतरापर्यंत पायपीट करावी लागत आहे.