लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

अलिबाग : औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद पाठोपाठ आता अलिबागचेही नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही मागणी केली आहे. अलिबागचे नाव मायनाक नगरी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मात्र या मागणीला अलिबाग मधून विरोध होऊ लागला आहे.

परकीय आक्रमणांपासून स्वराज्याचे रक्षण करण्यात सागरी किल्ले आणि मराठा आरमाराने महत्वाची भूमिका बजावली. अलिबाग येथील खांदेरी-उंदेरी बंदरावरील किल्ला आणि तेथील मायनाक भंडारी यांचा पराक्रम, चिवट संघर्ष यापुढे इंग्रजांना देखील माघार घ्यावी लागली होती. स्वराज्याचे आरमार आणि त्यासंदर्भातील इतिहास यातील मायनाक भंडारी यांच्या या पराक्रमाचा ऐतिहासिक संदर्भ घेता अलिबाग शहरासह तालुक्याचे “मायनाक नगरी” असे नामकरण करण्यात यावे आणि मायनाक भंडारी यांचे अलिबाग शहरात भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशा आशयाचे एक पत्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

आणखी वाचा-“…म्हणून मी ठाकरेंच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार नाही”, राजू शेट्टींनी स्पष्ट केली भूमिका

Rahul Narvekars letter to Chief Minister to Change the name of Alibaug

अखिल भारतीय भंडारी महासंघाचे अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर, मुख्य सचिव प्रकाश कांबळी, सह सचिव वैभव तारी आणि प्रवक्ते शशांक पाटकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट ही मागणी केली होती.

सदरची मागणी अतिशय रास्त असून त्याची शासन स्तरावरून उचित दखल घेण्यात यावी आणि नामकरण, स्मारक उभारणी याद्वारे या मागणीची पूर्तता व्हावी, अशी शिफारस विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. दरम्यान या मागणीला अलिबाग मधूनच विरोध होऊ लागला आहे. कान्होजी राजे आंग्रे यांच्या वंशजांनी यावर आक्षेप घेतला आहे.

आणखी वाचा- बारसूचा वाद: राज ठाकरे यांनी उल्लेख केलेले मायनाक भंडारी कोण होते?

अलिबागच्या नावाला ऐतिहासिक महत्व आहे. त्यामुळे हे नाव बदलाची गरज नाही. आणि कोणाची हे नाव बदलायची मागणी असेल तर सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या नावाचा विचार प्राधान्याने व्हायला हवा. मायनाक भंडारी यांचे कर्तृत्व आहे यात शंका नाही. पण म्हणून अलिबागला त्यांचे नावे देणे उचित होणार नाही. निवडणूकीच्या तोंडावर एखाद्या समाजाला खूष करण्यासाठी अशा मागण्या करणे चुकीचे आहे. -रघुजीराजे आंग्रे, आंग्रे घराण्याचे वंशज.