विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात विरोधकांच्या असहकार्याच्या भूमिकेमुळे फारसे कामकाज होऊ शकले नाही. अखेर सोमवारी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आणि दुष्काळाच्या प्रश्नावर चर्चा घडवून आणण्यावर एकमत झाले असून, सरकार चर्चेनंतर उपाययोजनांची घोषणा करेल, असे आश्वासन विधीमंडळ कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी दिले. त्यामुळे विधीमंडळाचे कामकाज सोमवारपासून सुरळीत सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
दुष्काळामुळे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी विरोधकांनी पहिल्या दिवसापासून लावून धरली होती. या मागणीमुळे विधानसभेतही विरोधक व्हेलमध्ये उतरून घोषणाबाजी करीत होते. त्यामुळे सभागृहाच्या कामकाजावर त्याचा परिणाम झाला. दुसऱ्या आठवड्यातही विरोधकांनी असहकाराची भूमिका स्वीकारू नये, यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत राज्यातील दुष्काळा, शेतकऱ्यांचे प्रश्न, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न यावर चर्चा घडवूण आणण्याची तयारी सरकारने दर्शविली. या चर्चेला उत्तर देताना सरकार उपाययोजनांची घोषणा करेल, असे आश्वासन गिरीश बापट यांनी दिले. या आश्वासनामुळे समाधान झाल्यावर विरोधकांनी कामकाजात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने रचनात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या बैठकीनंतर व्यक्त केली.

Story img Loader