अहिल्यानगरः सेवानिवृत्त शिक्षकाकडून ८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना माध्यमिक शिक्षण कार्यालयातील वेतन व भविष्य निर्वाह विभागातील सहायक लेखाधिकारी अशोक मनोहर शिंदे (४९, रा. तुळसाई पार्कमागे, गावडे मळा, पाईपलाईन रस्ता, सावेडी, अहिल्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक शिंदे याला अटक करण्यात आली आहे.

तक्रारदार शिक्षक हे ३ जून २०२२ रोजी शिक्षक म्हणून निवृत्त झाले. परंतु त्यांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम आजपर्यंत मिळालेली नाही. त्यासाठी त्यांनी माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयात पाच ते सहा वेळा चकरा मारल्या. वेतन व भविष्य निर्वाह निधी विभागातील सहायक लेखाधिकारी अशोक शिंदे याने शिक्षकाला तुमचे काम खूप जुने आहे ते करून देण्यासाठी बक्षीस म्हणून २० हजार रुपये द्यावे लागतील, अशी लाचेची मागणी केली.

शिक्षकाने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहिल्यानगर कार्यालयाकडे केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल, मंगळवारी त्याची पडताळणी केली. याच दरम्यान सहायक लेखाधिकारी अशोक शिंदे याने तक्रारदार सेवानिवृत्त शिक्षकाची भविष्य निर्वाह निधीची फाईल मंजूर करण्यासाठी लाचेच्या पहिल्या हप्त्याची पंचासमक्ष मागणी केली. त्यानुसार माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयातच पथकाने सापळा रचला व सहायक लेखाधिकारी अशोक शिंदेला पंचासमक्ष ८ हजार रुपये लाच स्वीकारताना पकडण्यात आले.

यासंदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकाचे पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक छाया देवरे, अंमलदार सचिन सुद्रुक, गजानन गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Story img Loader