वांग-मराठवाडी गावठाण यंदा बुडीत होणार नाहीत याची दक्षता घेऊ तसेच पूररेषेवर गावठाण वसवण्याच्या दृष्टीने आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, असे आश्वासन सातारा पाटबंधारे खात्याच्या अधिका-यांनी धरणग्रस्तांबरोबर झालेल्या बठकीत दिले.
गेल्या आठवडय़ात वांग-मराठवाडी धरणग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले होते. त्या वेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) लघुपाटबंधारे स्थानिकस्तर विभागाचे अधिकारी यांच्या बरोबर बठक घेण्याचे आश्वासन अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांनी दिले होते. त्यानुसार ही बठक झाली. धरणग्रस्तांच्या वतीने सुनीती सु.र. तसेच हेमा सोनी आदी उपस्थित होते.
या वेळी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एस. डी. गिरी यांनी धरणग्रस्तांच्या व्यथावेदना ऐकल्या. पीकनुकसानी देणे, गावठाणाचे बुडीत होऊ देणार नाही, गावठाणांचे पुनर्वसन पूररेषेवर करण्याचे प्रयत्न सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले. गावठाण वसवण्यासाठी पाटण तहसीलदारांकडे दोन दिवसांत संमतिपत्रे दिली जातील असे धरणग्रस्तांनी सांगितल्यावर संमतिपत्रे मिळाल्यावर त्या भागाची पाहणी करून गाव वसण्यास मंजुरी दिली जाईल असे उपजिल्हाधिकारी धुमाळ यांनी सांगितले. पीक नुकसानभरपाईचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवल्याचे धुमाळ यांनी सांगितले.
धरणग्रस्तांनी शासकीय कामकाजाच्या बाबी तातडीने कराव्यात असे आवाहन या वेळी केले.