एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेते बंडखोरी केल्यानंतर भाजपासह जाऊन नवं सरकार स्थापन केलं. तेव्हापासून हे सरकार कोसळणार असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसंच, शिवसेनेतील १६ आमदार अपात्रतेचं प्रकरण राहुल नार्वेकर यांच्या दरबारी असून डिसेंबरअखेरपर्यंत अपात्रतेचा निकाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३१ डिसेंबर रोजी हे सरकार पडणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जातोय. या सर्व आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ते ठाण्यात धर्मवीर २ चित्रपटाच्या मुहुर्त कार्यक्रमात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मी नगरविकास मंत्री होतो, आता मी मुख्यमंत्री आहे. यामध्ये दिघे साहेबांचे आशीर्वाद आहेत. बाळासाहेबांचे विचार आहेत. मी देखील नेहमी विचार करत असतो, शेवटी आपल्या हातून या राज्याला काय फायदा होईल? सर्वसामान्य लोकांना काय फायदा होईल? हा सातत्याने प्रयत्न असतो. गेले वर्ष सव्वा वर्ष निर्णय सर्व सामान्यांचे हिताचे निर्णय घेतले”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

आनंद दिघे पाठिशी उभे आहेत

“लोकांचा सर्वदूर विकास झाला पाहिजे. आनंद साहेबांच्या विचारांतच सर्वदूर विकास होता. त्यामुळे आम्ही हे सगळं करतोय. यामागे अनेक संकटं आहेत. सरकार स्थापन झाल्यापासून सगळे लोक सरकार पडणार, सरकार जाणार म्हणून ओरडत होते. आता हे ज्योतिष थकले, कारण आनंद दिघे साहेब माझ्या पाठिशी उभे आहेत. आता म्हणायला लागले की मुख्यमंत्री बदलणार. परंतु, सरकार अधिक मजबूत होत गेलं. तारीख पे तारीख चालू आहे. आता ३१ डिसेंबरला सरकार बदलणार असं सांगत आहेत”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.

…म्हणून दिघेसाहेब ठाण्यापर्यंत मर्यादित राहिले नाहीत

“शेवटी आपण आपलं काम करायचं असतं. कोणत्याही स्वार्थापोटी, मला काय मिळेल यापेक्षाही मी राज्याला आणि देशाला काय देतोय हे महत्त्वाचं आहे. म्हणून दिघे साहेब ठाण्यापर्यंत मर्यादित राहिले नाहीत. अयोध्येला आनंद दिघेंनी अडवणींच्या हस्ते पहिली चांदीची वीट दिली. आज राम मंदिराचंही उद्घाटन होत आहे. मोदींनी राम मंदिरही बनवलं आणि उद्घाटनाचीही तारीख सांगितली. सगळं होतंय, चांगलं होतंय. आनद दिघे आणि बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होतंय”, असंही ते म्हणाले.

धर्मवीर २ चा मुहुर्त संपन्न

धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटातून स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवनप्रवास मांडण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. “धर्मवीर” चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर काही महिन्यांपूर्वी ‘धर्मवीर २’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. आज “धर्मवीर २” या चित्रपटाचा मुहूर्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे येथे करण्यात आला. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक ,कलाकार, तंत्रज्ञ तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती. येत्या ९ डिसेंबरपासून ठाणे येथे चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astrologers are tired of saying that the government will fall and now eknath shindes retort to the opposition said dighe sir sgk
Show comments