अलिबाग : अलिबागजवळच्या खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटीला आग लागली. ९० टक्के बोट जळून खाक झाली असून या बोटमालकाचे १ कोटी ८० लाखाहून अधिक रूपयांचे नुकसान झाले आहे.
सुदैवाने बोटीवर असलेल्या १५ खलाशांचा जीव वाचला आहे. तटरक्षक दलाच्या मदतीने सर्व खलाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
अलिबागच्या साखर गावातील एकविरा माऊली ही बोट समुद्रात मासेमारीसाठी गेली होती. शुक्रवारी पहाटे मासेमारी करून परतत असताना बोटीला अचानक आग लागली. बोटीवरील खलाशांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचे प्रयत्न असफल ठरले. आगीचे लोट वाढताना दिसताच खलाशांनी समुद्रात उड्या घेतल्या व दुसऱ्या बोटीने किनार्यावर आले. यामध्ये तटरक्षक दलाने मदतकार्य केले.
या आगीत बोटीतील जाळी, मासेमारीसाठी लागणारी अवजारे जळून खाक झाली. समुद्रातील बोट किनार्यावर आणण्यासाठी एक एक करीत सर्व मच्छीमार प्रयत्न करू लागले होते. बोटीतील यंत्र सामुग्री निकामी झाली आहे. स्थानिकांच्रूा मदतीने बोट किनारयावर आणण्यात आली.