महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मुंबईत भायखाळा येथे मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहत्सवास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी केलेल्या छोटेखानी भाषणात मिश्किल टोलेबाजी केल्याचे दिसून आले. याप्रसंगी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांचीही उपस्थिती होती.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मिसळ महोत्सवात मिसळीचा घमघमाट आणि राजसाहेबांचे मिश्किल टोले! अशा मथाळ्याखाली राज ठाकरेंचा हा व्हिडीओ मनेसेने ट्वीट केला आहे.
हेही वाचा – राज ठाकरे ‘नवं काहीतरी’ या विषयावर पुण्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष
यामध्ये, “कुठेही हातात माईक सोपवला जातो, कोणती जागा आहे, कुठे काय आहे, लोक छान मिसळ खात आहेत, काहीजण गोड खात आहेत. खरंतर अशा ठिकाणी कोणाला बोलायला लावू नये. सनईवाल्यासमोर जर का तुम्ही चिंच खात बसलात तर त्याला सनई वाजवता येत नाही. त्याच्या तोंडातून सारखी लाळ पडते. तरी तशी अशाप्रसंगी आमची सनईवाल्यासारखी अवस्था असते. बोलायला सांगतात आणि बाजूने सगळ्या प्रकारचे सुगंध येत असतात. तुम्ही सगळ्यांनी या महोत्सवाचा आस्वाद घ्यावा, तुम्हा सर्वांना इंग्रजी दिनदर्शिकेनुसार मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. नववर्ष आपल्या सर्वांना सुख, समृद्धी, आरोग्य आणि भरभराटीचं जावो आणि निरोगी दीर्घायुष्य मिळो एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.” असं राज ठाकरे बोलताना दिसतात.
मिसळ महोत्सव हा मिसळप्रेमींसाठी आणि खवय्यांसाठी आनंदाची पर्वणीच असते, राज्यभरातली विविध प्रकाराच्या मिसळींचा या ठिकाणी नागरिकांना आस्वाद घेता येतो. या महोत्सवास गर्दीही प्रचंड होते.