नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला गोळी झाडून ठार मारण्यात शनिवारी अखेर वनविभागाच्या शार्पशुटर्सना यश आले. ही घटना शनिवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास दिघोरी वनपरिक्षेत्रातील मालदा ते सोनझरीच्या जंगलात घडली. या वाघाने गोंदिया-भंडारा जिल्ह्य़ाच्या वनपरिक्षेत्रातील सीमेवर गेल्या २० दिवसांपासून धुमाकूळ घालून ५ महिलांचा बळी घेतल्यानंतर या परिसरातील १२ गावात दहशत निर्माण झाली होती. या वाघाला पकडण्यासाठी १० शार्पशुटर्सची चमू, २२ मोटारगाडय़ांचा ताफा, ९० बंदूकधारी, १५० वन व पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात आली.
दोन दिवसांपूर्वी या वाघाने बोंडगावदेवी ते दिघोरी जंगल परिसरात एका गायीच्या वासराची शिकार केली  व त्यानंतर वनविभागाच्या संपूर्ण चमूने आपला मोर्चा या दिघोरी वनपरिक्षेत्राकडे वळविला होता. गेल्या दोन दिवसांपासून या वाघाचा ठावठिकाणा याच वनपरिक्षेत्रात आढळून येत असल्याने आज दुपारच्या सुमारास त्याच्या पायांच्या ठशांचा मागोवा घेत वनविभागाच्या तज्ज्ञांच्या चमूने त्याचा पिच्छा पुरविला. त्यांना अखेर मालदा ते सोनझरीच्या जंगलात वाघ आढळल्यावर प्रथम त्याला बेशुद्ध करण्याचे प्रयत्न करण्यात आले, पण या परिसरात जंगल घनदाट असून या चमूला बेशुद्ध करणे अवघड जात असल्याने अखेर त्याला गोळ्या घालण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. त्याचा मृतदेह उत्तरीय    तपासणीकरिता चुलबंद येथे आणण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा