दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी १९४२ च्या लढ्यात भाग घेतला. त्यावेळी त्यांना कारावास झाला. पण अवघ्या ९ दिवसांनंतर वाजपेयींनी माफीनामा लिहून दिला आणि ते बाहेर आले. त्यानंतर ते आयुष्यभर कधीच कारागृहात गेलेच नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांना तब्बल १८ वेळा माफीनामा लिहून दिला आहे, असे म्हणत संघाच्या नेत्यांनीच जनसंघाचे त्यावेळेचे नेते दिनदयाळ उपाध्याय यांची हत्या केल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार उल्हास पवार यांनी केला आहे. दरम्यान, भाजपाने हे आरोप फेटाळले असून काँग्रेसची विश्वासहर्ता घसरली असून अत्यंत गलिच्छ आणि बेजबाबदारपणे हे आरोप केल्याचे भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.

पवार हे नागपूर येथे जनसंघर्ष यात्रेत बोलत होते. आपण अत्यंत जबाबदारी बोलत असल्याचे त्यांनी भाषणाच्या सुरूवातीलाच म्हटले. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे त्यावेळचे करंदीकर आणि लिमये नावाच्या दोन नेत्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा दाखल त्यांनी दिला. सभ्य स्त्रियांनी सावरकरांच्या घरी जाऊ नये, असे करंदीकर आणि लिमयेंनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे.

बलराज मधोक हे अनेकवर्षे जनसंघाचे अध्यक्ष होते. ते दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांनी आपले आत्मचरित्र दोन खंडात लिहिले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने ज्या दिनदयाळ उपाध्याय यांच्या नावाचा उल्लेख करतात. त्या उपाध्याय यांचा त्यावेळी रेल्वेत संशयास्पद मृत्यू झाला होता. उपाध्याय यांनी गांधीजींची अंत्योदयाची कल्पना घेतली होती. यावरून त्यांची हत्या झाल्याची त्यावेळी चर्चा होती. यामध्ये संघाच्या त्यावेळच्या तीन नेत्यांची नावे घेतली जातात. त्या तिघांची नावे आता घेणे योग्य ठरणार नाही. कारण त्या तिनही व्यक्ती सध्या हयात नाहीत, असे पवार म्हणाले.

दरम्यान, भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उल्हास पवार यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. हे बेछुट आरोप असून प्रसिद्धी मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. दिवसेंदिवस काँग्रेसची विश्वासहर्ता घसरत चाललेली आहे. एकूणच काँग्रेसची वाताहत सुरू असून त्यांच्याकडे ना धोरण आहे ना नेता आहे, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

Story img Loader