Mumbai-Navi Mumbai Atal Setu Bridge :अटल सेतू हा त्यांच्या नावाप्रमाणेच अटल आहे. या पुलाला अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव असणं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लोकार्पण ही या पुलाच्या बळकटीची खात्री देणारी आहे. हा पूल २२ किमी मार्गाचा आहे. भूकंपाचे धक्केही हा पूल सहन करु शकतो. मात्र येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये भूकंपाचे झटके आमच्या विरोधकांना बसणार आहेत. शिवडी न्हावा शेवा हा विजयाकडे घेऊन जाणारा महामार्ग आहे. अन्याय आणि अत्याचाराचा अंत करण्यासाशी प्रभू रामाच्या सेनेने समुद्र सेतू बांधला होता. हा सागरी सेतूही अहंकारी लोकांचा अहंकार मोडणारा ठरेल यात शंका नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात आणि उत्साह संचारतो
महाराष्ट्रातल्या विकास प्रकल्पांच्या लोकार्पणासाठी आपण जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलवतो तेव्हा ते येतात आणि लोकांममध्ये एक नवाच उत्साह संचारतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जितकं प्रेम मिळतं आहे तेवढं जगात कुणाला मिळत नसेल. त्यामुळेच विकासाच्या विरोधात जे आहेत त्यांना पोटदुखी होते. मात्र कुणाचीही पर्वा न करता आपण सरकारचं काम सुरु ठेवलं आहे. आपण सद्भवना आणि सद्हेतूने सेतू तयार केला आहे त्यामुळे लोक याच्याशी जोडले गेले आहेत.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आता ४५ पार
अब की बार ४०० पार या नाऱ्याला बळ देण्यासाठी मी म्हणेन फिर एक बार मोदी सरकार, महाराष्ट्रात ४५ पार हा संकल्प घेऊन आपण पुढे जात आहोत. जो विकास आमचं सरकार येण्याआधी ठप्प झाला होता तो विकास आम्ही आता मोदींच्या आशीर्वादाने हे सरकार करतं आहे. मी नम्रतापूर्वक इतकंच सांगेन की मोदींच्या मार्गदर्शनामुळे महाराष्ट्रात पायाभूत सुविधा सर्वाधिक जास्त प्रमाणात सुरु आहेत. अटल सेतू हा गेमचेंजर प्रकल्प आहे. यामुळे अर्थव्यवस्था बदलणारा ठरणार आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
देशात मोदींच्या नेतृत्वात बुलेट ट्रेनच्या गतीने विकास होतो आहे
आज महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार अत्यंत गतीने काम करतं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवडता बुलेट ट्रेन प्रकल्पही थांबवण्यात आला होता. मात्र आमचं सरकार आल्यानंतर तो प्रकल्पही सुरु झाला आहे. देशाची प्रगती मोदींच्या नेतृत्वात बुलेट ट्रेनच्या गतीने होते आहे हे वास्तव आहे. ५० वर्षात जे जमलं नाही ते मोदींनी ९ ते साडेनऊ वर्षात करुन दाखवलं आहे हे मान्य करावंच लागेल असंही एकनाथ शिंदे म्हणाले. भारताची अर्थव्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.