गुन्हेगारी विश्वातून राजकारणात आलेला अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोलीस दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी प्रयागराजमधील रुग्णालयात घेऊन जात होते. रग्णालयाच्या बाहेर तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून अतिक आणि अशरफची हत्या केली. या हत्याकांडाची संपूर्ण देशभरात चर्चा आहे. काही लोकांनी या हत्याकांडाचं समर्थन केलं आहे, तर काहींनी या हत्यांना विरोध केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे झालेल्या या हत्याकांडाचे अनेक ठिकाणी पडसाद उमटले. महाराष्ट्रातही ते पाहायला मिळालं. बीड जिल्ह्यातील माजलगावात आज (१९ एप्रिल) सकाळी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या सर्थनार्थ बॅनर लावण्यात आले होते. तसेच या बॅनरवर शहीद असा उल्लेख केला होता. बॅनर लावणाऱ्यांनी अतिक आणि अशरफच्या हत्यांचा निषेधही केला आहे.

दरम्यान, या बॅनरबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी लगेचच हे तिथून हटवले. पोलिसांनी सांगितलं की, मोहसीन भय्या मित्र मंडळाने हे बॅनर लावले होते. तसेच याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोघांना ताब्यात घेतलं आहे. तसेच या मोहसीन पटेलचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी हे बॅनर बनवणाऱ्या लोकांनाही ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी आणखी काही लोकांना अटक होऊ शकते.

हे ही वाचा >> “मी अतिक अहमदचं समर्थन…:”, बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट चर्चेत, म्हणाला, “त्याचं कर्म…”

खरंतर महाराष्ट्राशी किंवा बीडशी या घटनेचा तीळमात्र सबंध नाही. तरीदेखील माजलगावातल्या काही तरुणांनी हे बॅनर लावून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे.