लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : जगातील सर्वांत मोठ्या पतंगापैकी एक असलेले ‘ॲटलास मॉथ’ शिराळा येथील बस स्थानक शेजारी असणाऱ्या पंचायत समिती सभापती निवासस्थानाच्या आवारात आढळून आले. पंखाच्या टोकाला नागाच्या तोंडाचा आकार असल्यामुळे शिराळ्यात नागाचे फुलपाखरू आले ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे पतंग पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

जवळपास अकरा इंच मोठा पतंग होता. याच्या दोन्ही पंखांच्या टोकाला नागाचे तोंड व आकार दिसत होता. शिराळ्यातील नागपंचमी जगप्रसिद्ध आहे. तशातच येथे नागाचे तोंड असलेले फुलपाखरू आढळल्यामुळे अनेकांनी हातातील भ्रमणध्वनीवर त्याची छबी टिपली. नागाचे फुलपाखरू शिराळ्यात आल्याची बातमी शहरात पसरली. त्यामुळे पतंग पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. जिज्ञासेपोटी आंतरजालावर शोध घेतला असता ते दुर्मीळ व जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले ॲटलास मॉथ असल्याचे समजले. याचा रंग आकर्षक बदामी, तपकिरी व किंचित लालसर असतो. त्याच्या पंखांवर नकाशाप्रमाणे मोठे पांढरे ठिपके असतात. त्यामुळेच त्याला ॲटलास मॉथ म्हणतात. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे याला तोंड किंवा पचनसंस्था नसते. सुरवंट, अळी असतानाच त्याने भरपूर खाऊन घेतलेले असते.

आणखी वाचा-कासच्या पर्यटकांची बनावट संकेतस्थळाद्वारे फसवणूक

या पतंगाचे आयुष्य जेमतेम पाच ते सात दिवसांचे असते. या अल्प कालावधीमध्ये अंडी घालून वारस मागे ठेवून हे पतंग मरतात. शक्यतो रात्रीच दिव्यांच्या प्रकाशाकडे आकर्षित होणारा पतंग निशाचर आहे. क्वचितच दिवसा आढळतात. सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात प्रकर्षाने दिसतात. हा पतंग दालचिनी, लिंबू, जांभूळ, पेरू व लिंबू वर्गीय झाडांवरच आढळतो.