पंधरा दिवसांपूर्वी तालुक्यामध्ये अॅटलस प्रजातीचे दुर्मीळ पतंग सापडलेला असताना तालुक्यामध्ये पुन्हा एकदा दुर्मीळ प्रजापतीचा पतंग सापडला आहे. उत्तर अमेरिकेमध्ये आढळणारा ‘अँक्टिनास ल्युना’ हा पतंग तालुक्यामध्ये सलग दुसऱ्या वर्षी सापडला आहे. शहरातील तहसीलदार कार्यालयाच्या भिंतीवर हा पतंग काल सायंकाळी आढळला.
सह्य़ाद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या तालुक्याच्या जंगल परिसरामध्ये दुर्मीळ प्रजातीच्या प्राणी आणि पक्ष्यांचे वास्तव्य असल्याचे यापूर्वीच पुढे आले आहे. गत आठवडय़ामध्ये तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीच्या भिंतीवर अॅटलस या दुर्मीळ प्रजातीचे फुलपाखरू आढळले होते. काल सायंकाळी याच इमारतीच्या भिंतीवर दुर्मीळ प्रजातींचे फुलपाखरू (पतंग) असलेले अँक्टिनास ल्युना फुलपाखरू (पतंग) आढळले. हा पतंग भिंतीवर बसलेला तलाठी शेवाळे यांच्या निदर्शनास आला. त्यांनी निवासी नायब तहसीलदार राजेंद्र बिर्जे आणि पक्षीमित्र धनंजय मराठे यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ पाहणी केली असता हा दुर्मीळ प्रजातीचा पतंग असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुमारे पंधरा दिवसांचे जीवनमान असलेल्या पतंगाच्या पंखांचा रंग पोपटी फिक्कट असून, त्याच्या पंखाची रचना चंद्राच्या कलेप्रमाणे आहे. तालुक्यामध्ये सापडलेला हा मादी पतंग असून त्याच्या दोन पंखांमधील अंतर १०.५ सेंमी, तर उंची १६.५ सेंमी. असल्याची माहिती पक्षीमित्र मराठे यांनी दिली.